मेलबोर्न : जगात क्रिकेटचे संचलन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) माझ्यासोबत पक्षपात केला असून रविवारी विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात चषक प्रदान करण्याच्या अधिकारापासून मला वंचित करण्यात आले, असा आरोप आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी केला आहे. मुस्तफा यांनी आयसीसीमध्ये सुरू असलेला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणण्याची धमकी दिली आहे. मुस्तफा म्हणाले, ‘‘जेतेपद पटकावणाऱ्या संघाला माझ्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात येणार नाही. आयसीसीच्या घटनेनुसार तो माझा अधिकार होता, पण दुर्दैवाने मला तसे करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे माझा व अध्यक्षपदाच्या अधिकाराचा अपमान झाला. बांगलादेशमध्ये पोहोचल्यानंतर आयसीसीमध्ये काय सुरू आहे, याबाबत वक्तव्य करणार असून अशी कृती करणाऱ्या लोकांबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देणार आहे.’’ यंदा जानेवारी महिन्यात आयसीसीच्या बदललेल्या नियमांनुसार विश्वदर्जाच्या स्पर्धांमध्ये आयसीसीच्या अध्यक्षांना चषक प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, पण रविवारी संपलेल्या विश्वकप स्पर्धेत विजेत्या आॅस्ट्रेलिया संघाला आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी चषक प्रदान केला. त्यानंतर मुस्तफा नाराज झाले व निघून गेले. यासाठी भारत व बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीनंतर झालेला वाद कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. त्या लढतीत पंचांनी भारताच्या बाजूने निर्णय दिल्याचा आरोप करीत मुस्तफा यांनी आयसीसी म्हणजे ‘इंडियन क्रिकेट परिषद’ असल्याचे वक्तव्य केले होते. (वृत्तसंस्था)
चषक प्रदान करण्याचा अधिकार हिसकावला गेला
By admin | Published: March 31, 2015 12:02 AM