स्वप्न प्रत्येक जणं पाहत असतो. पण सर्वांचीच स्वप्न पूर्ण होत नाहीत. जी झोपेत स्वप्न बघतात, ती तिथेच विरुन जातात. पण जी स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलं जातं, ते सत्यात उतरवण्यासाठी तुमच्याकडे फक्त गुणवत्ता असून चालत नाही. कारण गुणवत्तेबरोबर अथक मेहनत घ्यायची तयारी लागते. चिकाटी लागते. प्रवाहाविरोधात पोहोण्यासाठी हिंमत लागते. काही जण या विरोधाला बळी पडतात, तर काही विरोधाचा बीमोड करत अशक्यप्राय गोष्टही साध्य करतात. अशी भारताची गोल्डन गर्ल. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. बाबा रिक्षा चालवायचे. आई लोकांच्या घरी काम करायचा जायची. त्यामधून जे काही उत्पन्न मिळायचं, ते दोन वेळच्या जेवणामध्येच संपवून जायचं. पण वडिल रिक्षा चालवत असले तरी तिला गगनभरारी घेण्याचं वेड होतं आणि तिने ते पूर्णही केलं. तिचं नाव स्वप्ना बर्मन. भारताला हॅप्टेथ्लॉन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणारी पहिली खेळाडू स्वप्ना ठरली.
पश्चिम बंगलामधील जलपायगुडी येथे स्वप्ना राहायची. स्वप्नाच्या पायांना सहा बोटं आहेत. त्यामुळे लहान असताना तिला व्यवस्थित चालताही यायचं नाही. पण ती खचली नाही. खेळाच्या सुरुवातीला तर सहा बोटांसाठी बूटही तिच्याकडे नव्हते. पण तिने हार मानली नाही आणि आताच्या घडीला ती भारतीय क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रेटी बनली आहे.
आपल्या खडतर प्रवासाबद्दल स्वप्ना म्हणाली की, "मी जिथे सरावाला जायची किंवा स्पर्धेला जायची तिथे मला हिणवले जायचे. हा खेळ तुझ्यासाठी नाही. तु फारच जाड आहेस. तुझी उंची कमी आहे. तुला या खेळात काहीच करता येणार नाही, अशी टीका लोकं करायचे. पण मला माझ्या खेळावर विश्वास होता. घरच्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला. आता जेव्हा लोकं माझी सही घेण्यासाठी धावत येतात, तेव्हा आनंद गगनात मावत नाही."