ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १९ : भारताची युवा महिला गोल्फर अदिती अशोककडून आॅलिम्पिकच्या पदकाची आशा आहे. १८ वर्षांच्या अदितीने दुसऱ्या फेरीत संयुक्त सातवे स्थान मिळविले. अदिती केवळ तीन स्ट्रोकमागे असल्याने भारताला या खेळात पदकमिळण्याची अपेक्षा बळावली आहे.
अव्वल स्थानावर असलेली अमेरिकेची स्टेसी लुईस हिच्यापेक्षा अदिती तीन स्ट्रोकने मागे आहे. अदितीने सलग दुसऱ्या दिवशी तीन अंडर ६८ चे उत्कृष्ट कार्ड खेळल्याने तिला संयुक्त सातवे स्थान मिळाले. दुसऱ्या राऊंडमध्ये अदितीने पाच बर्डी खेळल्यामुळे सातव्या राऊंडअखेर तिची गुणसंख्या सहा अंडर १३६ अशी झाली.
अदितीने पहिल्या राऊंडमध्ये देखील तीन अंडर ६८ चे शानदार कार्ड खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामगिरीत सातत्य राखले. अमेरिकेच्या स्टेसीने पहिल्या राऊंडमध्ये ७० चे कार्ड खेळले होते. दुसऱ्या राऊंडमध्ये तिने दहा बर्डीसह ६३चे कार्ड खेळताच स्टेसीची गुणसंख्या दोन राऊंडनंतर नऊ अंडर १३३ झाली आहे. सध्या ती अव्वल स्थानावर पोहोचली.ब्रिटेनची चार्ली हल हिने पहिल्या राऊंडमध्ये ६८ आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ६६ चे कार्ड खेळताच आठ अंडरसह ती दुसऱ्या स्थानावर दाखल झाली.
मरियाने स्कारनोर्ड (६९-६६), लार्सन निकाले बोस (६७-६८) तसेच इन्बी पार्क या सर्व संयक्त तिसऱ्या स्थानी आहेत. वडील अशोक गुडलामणी यांच्यासोबत असलेल्या अदितीने दोन्ही दिवशी ६८-६८ चे कार्ड खेळून संयुक्त सातवे स्थान घेतले.