ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ११ - रिओ ऑलिम्पिकमधला प्रत्येक दिवस भारतीयांसाठी निराशाजनक ठरत असताना आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. एआयबीएने भारतीय बॉक्सर्सना देशाचे नाव असलेली जर्सी परिधान करण्यावरुन इशारा दिला आहे.
भारतीय बॉक्सर्सनी देशाचे नाव असलेली जर्सी परिधान केली नाही तर, पुढचे सामने खेळू देणार नाही असा इशारा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने दिला आहे. मनोज कुमार आणि विकास कृष्णन यांनी आधीच आपले पहिल्या फेरीचे सामने जिंकले आहेत. शिव थापाला अजून पहिला सामना खेळायचा आहे.
मनोज कुमारने बुधवारी पहिला सामना जिंकल्यानंतर एआयबीएच्या अधिका-यांनी त्याला जर्सीवरुन इशारा दिला. पाठीवर देशाचे नाव लिहीलेली जर्सी नसेल तर पुढच्या सामन्यात खेळू देणार नाही असे मनोज कुमारला सांगण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव असलेली जर्सी घालणे बंधनकारक आहे. रिओमध्ये आता अखेरच्या क्षणी भारतीय बॉक्सर्ससाठी नव्या किटची जुळवाजुळव करण्यासाठी अधिका-यांची धावपळ सुरु आहे.