रिओ, दि. 11 - हॉकी सामन्यात नेदरलँडने भारताला 2-1 ने पराभूत केले. सामन्याच्या शेवटच्या सहा सेकंदांमध्ये भारतीय हॉकी संघाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. मात्र हॉकी संघानं या संधीचं सोनं केलं नाही. सलग मिळालेल्या चार पेनल्टी कॉर्नरपैकी एकातही संधी साधता न आल्याने भारताला नेदरलँड्सकडून 2-1 असा पराभव पत्करावा लागला आहे.
हॉकी सामन्यांपैकी भारतानं यापूर्वीच दोन विजय संपादन केले. नेदरलँडसमोर भारतीय हॉकी संघाला स्वतःचा बचाव करताना अडथळे येत होते. तिस-या आणि चौथ्या फेरीत भारताला चेंडूंवर ताबा मिळवता येत नव्हता. नेदरलँड्सने 32 व्या मिनिटाला पहिला गोल केल्यानंतर 38 व्या मिनिटाला रघुनाथने भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर 54 व्या मिनिटाला नेदरलँड्सने आघाडी मिळविली.
हॉकी संघाची पिछेहाट झाली असतानाच पंचांशी हुज्जत घातल्याने एस. सुनीलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताने आक्रमकता दाखवली. पण त्यामध्ये गोल करण्याची मिळालेल्या संधी साधता न आल्याने भारताला अखेर पराभव पत्करावा लागला आहे.