ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १२ - रिओमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात तिसरं पदक जमा झाले आहे. गोळाफेकमध्ये भारताच्या दिपा मलिकने रौप्यपदकाला गवसणी घातली. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला क्रीडापटू ठरली आहे.
४.६१ मीटर अशी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत दीपाने रौप्यपदक मिळवले. बहरीनच्या फातेमा नीधामने ४.७६ मीटर अंतरावर गोळाफेक करत सुवर्णपदक मिळवले. ग्रीसच्या दिमित्रा कोरोकीडाने ४.२८ मीटर अंतरावर गोळाफेक करुन कांस्यपदक पटकावले.
तामिळनाडूच्या मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंचउडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात तिसऱ्या स्थानावर राहिलेला उत्तर प्रदेशचा २१ वर्षांचा वरुणसिंग भाटी कांस्यपदकाचा मानकरी ठरला. तो एका पायाने पोलिओग्रस्त आहे.