गबाला (अझरबैजान) : भारतीय नेमबाज रिषिराज बारोट याने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वकप नेमबाजी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताला सुवर्ण मिळवून दिले. १९ वर्षांच्या रिषिराजने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात झेक प्रजासत्ताकाच्या खेळाडूला २५-२३ असे मागे टाकून सुवर्ण जिंकले.पात्रता फेरीत त्याने ५५६ गुणांची कमाई करून अंतिम ८ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. झेक प्रजासत्तकाचा लुकास सुकोमल रौप्याचा तसेच आॅस्ट्रेलियाचा सर्गेई इव्हेगलव्हस्की कांस्यपदकाचा मानकरी ठरला. रिषिराजने यंदा मे महिन्यात जर्मनीत ज्युनियर विश्वचषकात नववे स्थान मिळविले होते. भारताने आज दोन सुवर्णांसह ५ पदके जिंकली. एकूण ६ सुवर्ण, ४ रौप्य आणि ८ कांस्यांसह भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर आला. रशिया दहा सुवर्णांसह २१ पदके जिंकून पहिल्या स्थानावर कायम आहे.त्याआधी प्रतीक बोस, अर्जुन बाबू आणि प्रशांत यांच्या संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात १८४९.९ गुणांची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. सिंगापूरला रौप्य आणि जपानने कांस्य जिंकले. अर्जुन आणि प्रतीक हे वैयक्तिक प्रकारातही पात्र ठरले. अर्जुनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या ५ मीटर पिस्तुलमध्ये अनमोल, निशांत भारद्वाज व अर्जुन दास यांना १६०० गुणांसह सांघिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. १६४० गुणांसह रशियाने सुवर्ण पटकावले. महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये दिलरीन गिल, गीताक्षी दीक्षित व आषी रस्तोगी यांच्या संघाने कांस्य जिंकले. (वृत्तसंस्था)
रिषिराज बारोटला सुवर्ण!
By admin | Published: September 21, 2016 4:52 AM