नवी दिल्ली : फोगाट भगिनींमधील सर्वात धाकटी मल्ल रितू फोगाटला टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजनेतून बाहेर करण्यात आले. रितूने मिश्र मार्शल आर्टमध्ये पदार्पणाचा निर्णय घेतला असल्याने तिचे नाव कमी करण्यात आले आहे. रितूने स्वत:ला टोकियो आॅलिम्पिकसाठी उपलब्ध नसल्याचेही कळवले. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने रितूला टॉप्समधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.मनोज सरकार व प्रमोद भगत (पुरुष एकेरी एसएल ३), सुकांत कदर, तरुण व सुहास (पुरुष एकेरी एसएल ४) हे टॉप्समध्ये स्थान मिळालेले बॅडमिंटनपटू आहेत. तसेच, सहा जलतरणपटूंचाही २०२४ आॅलिम्पिकसाठी डेव्हलपमेंटल ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.1‘साई’ने स्पष्ट केले की,‘मल्ल रितू फोगाटचा सुरुवातीला टॉप्समध्ये समावेश करण्यात आला होता, पण आता तिला वगळण्यात आले आहे. कारण २०२० आॅलिम्पिकमध्ये ती सहभागी होणार नाही. ती सिंगापूरमध्ये मिश्र मार्शल आर्टमध्ये करिअर सुरू करीत आहे.’2राष्ट्रकुल कुस्तीमध्ये सुवर्ण आणि आशियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी रितू गीता व बबिता फोगाट यांची धाकटी बहीण आहे. साईच्या बैठकीमध्ये पाच पॅरा बॅडमिंटनपटूंना टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्समध्ये सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये साई महासंचालक नीलम कपूर व भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा सहभागी झाले होते.
मल्ल रितू फोगाट ‘टॉप्स’मधून ‘आऊट’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 5:12 AM