मुंबई : पाचव्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या रियाझ अकबर अलीने गतराष्ट्रीय विजेता संदीप देवरूखकर याचा पराभव करून चषकावर आपले नाव कोरले. महिला गटात आयेशा मोहम्मद अजिंक्यपदी विराजमान झाली. मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रियाझने आक्रमक सुरुवात करत गतविजेत्या संदीप देवरूखकरला २५-१०, २५-१७ अशा दोन सेटमध्ये नमवून स्पर्धेचे जेतेपद मिळवले. तत्पूर्वी उपांत्य सामन्यात रियाझने योगेशला तर संदीपने अनुभवी पंकज पवारला नमवून अंतिम फेरीत धडक मारली. जैन इरिगेशनच्या आयेशा व एल.आय.सी.च्या शिल्पा यांच्यातील अंतिम सामना फार चुरशीचा ठरला. दोघींनीही आपले खेळातील कौशल्य पणाला लावले. त्यांनी १-१ अशी बरोबरी केली. निर्णायक सेटमध्ये दमदार खेळ करत आयेशाने शिल्पाचा २५-१९, १०-२५, २५-०९ असा धुव्वा उडवत स्पर्धेच्या विजयी चषकावर कब्जा केला. एकंदर रियाज आणि आयेशा यांनी खेळात रंगत आणली. (क्रीडा प्रतिनिधी)
रियाज, आयेशा अजिंक्यपदी विराजमान
By admin | Published: June 18, 2015 1:24 AM