नवी दिल्ली : स्पॅनिश फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोनाचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्स्कीला (Robert Lewandowski) ऑटोग्राफ देणं चांगलच महागात पडले आहे. अलीकडेच बार्सिलोनामध्ये आलेल्या रॉबर्ट लेवांडोव्स्कीला त्याचे ५६ लाख रुपयांचे घड्याळ गमवावे लागले आहे. लेवांडोव्स्कीने मागील महिन्यातच बायर्न म्युनिकपासून वेगळे होऊन बार्सिलोनासोबत करार केला होता. क्लबमध्ये सामील झाल्यानंतर तो चाहत्यांना भेट देत होता. यावेळी त्याने अनेक चाहत्यांना ऑटोग्राफ देखील दिले, मात्र एका चोरट्याने त्याच्या हातातील मौल्यवान घड्याळ हिसकावून घेतले.
५६ लाखाचे घड्याळ गेल्याने खळबळ माहितीनुसार, बुधवारी जेव्हा तो सरावासाठी क्लबमध्ये पोहोचला तेव्हा नेहमीप्रमाणे बार्सिलोनाचे चाहते उपस्थित होते, जे खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सुक होते. तर दुसरीकडे लेवांडोव्स्की नुकताच या क्लबमध्ये सामील झाला होता, त्यामुळे खासकरून याला भेटण्यासाठी चाहत्यांची वरदळ सुरू होती. लेवांडोव्स्कीने देखील चाहत्यांना निराश केले नाही मात्र यावेळी त्याला ५६ लाखाच्या किमतीचे घड्याळ गमवावे लागले.
लेवांडोव्स्की पैशांचा वर्षाव दरम्यान, एवढे महागडे घड्याळ चोरून नेणाऱ्या चोराला पकडण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. तसेच लेवांडोव्स्कीला त्याचे मौल्यवान घड्याळ देखील परत मिळाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे लेवांडोव्स्की चोराला पकडण्यासाठी स्वत: त्याच्या मागे धावला होता मात्र तो त्याला पकडू शकला नाही. जर्मन लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लेवांडोव्स्कीसाठी बार्सिलोनाने बायर्न म्युनिकला ४५ मिलियन डॉलर म्हणजेच ३.६१ अब्ज रुपये इतकी मोठी रक्कम दिली आहे. मात्र बार्सिलोनामध्ये आल्यानंतर त्याला अद्याप विशेष काही कामगिरी करता आली नाही. लेवांडोव्स्कीच्या उपस्थितीत देखील संघाला विजय मिळवता आला नाही. बार्सिलोनाला लीगच्या नव्या हंगामात बरोबरीत समाधान मानावे लागले.