जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू रॉबिन पीटरसनने क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. ३७ वर्षांच्या पीटरसनने २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने आपल्या कारकिर्दीत १५ कसोटी, ७९ एकदिवसीय सामने, तर २१ टी-२० सामने खेळले. त्याने १३७ बळी मिळवले असून, फलंदाजीतही त्याने मोलाची कामगिरी केली आहे. पीटरसनने चार अर्धशतके झळकावली आहेत. पीटरसन डावखुरा फिरकी गोलंदाज असून, तळातील एक उपयुक्त फलंदाज म्हणूनही त्याने कामगिरी पार पाडली. २०१२ मध्ये त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये सहा बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेला मालिका विजय मिळवून दिला होता. २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक ११ बळी मिळवले होते.निवृत्तीच्या निर्णयाबाबत पीटरसन म्हणाला, ‘क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. याक्षणी माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. देशाकडून खेळणे हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते. मला देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी माझे संघ सहकारी व माझ्या पाठीराख्यांचा आभारी आहे.’ (वृत्तसंस्था)
रॉबिन पीटरसनची निवृत्ती
By admin | Published: November 10, 2016 4:28 AM