Roger Federer Announces Retirement: स्टार टेनिसपटू आणि तब्बल २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकणारा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याने आज अचानक निवृत्तीची घोषणा करून आपल्या चाहत्यांना धक्का दिला. 'टेनिसचा सम्राट' असलेल्या स्वित्झर्लंडच्या ४१ वर्षी रॉजर फेडररने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करून याची घोषणा केली. पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या लेव्हर कपमध्ये फेडरर शेवटची व्यावसायिक स्तरावरील स्पर्धा खेळताना दिसणार आहे. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत फेडरर संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. 'टेनिसच्या राजा'च्या निवृत्तीच्या निर्णयावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याने हळहळ व्यक्त करत फेडररसाठी भावनिक संदेश लिहिला.
सचिन तेंडुलकर हा जसा क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहे. त्याप्रमाणेच रॉजर फेडररदेखील टेनिसचा अतिशय महान खेळाडू आहे. त्यामुळे या दोघांनी अनेकदा एकमेकांच्या सामन्यांना हजेरी लावली. तसेच, अनेक वेळा एकमेकांच्या खेळाची तोंडभरून स्तुती केली. आज फेडररच्या या निर्णयानंतर सचिनने ट्वीट करत आपल्या भावनांना वाट करून दिली. "व्वा! काय करिअर आहे... रॉजर फेडरर, तुझ्या टेनिस खेळण्याच्या शैलीच्या आम्ही सारेच प्रेमात पडलो. हळूहळू तू म्हणजे टेनिस या समीकरणाची आम्हाला सवयच झाली. आणि सवयी कधीच निवृत्त होत नाहीत. तो आपला एक भाग बनतात. त्यामुळे तू आम्हां सर्वांना दिलेल्या अद्भुत अशा आठवणींच्या ठेव्याबद्दल तुला धन्यवाद", असा अतिशय भावनिक संदेश त्याने फेडररसाठी लिहिला.
फेडररने निवृत्तीच्या निर्णया वेळी काय म्हणाला?
आपल्या टेनिस कारकिर्दीतील प्रवासात फेडररने त्याचे चाहते आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचे आभार मानले आहेत. फेडरर म्हणाला की वयाच्या ४१ व्या वर्षी त्याला वाटते की आता टेनिस खेळणं थांबवण्याची वेळ आली आहे. फेडरर म्हणाला, 'मी ४१ वर्षांचा आहे. मी २४ वर्षात १५०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. टेनिसने मला कायमच खूप काही दिले. पण आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपण्याबद्दल मी निर्णय घेतला आहे.' फेडररने पुढे प्रत्येक मिनिटाला त्याच्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नी मिर्काचे आभार मानले. ' प्रत्येक फायनलपूर्वी तिने मला खूप प्रोत्साहन दिले. एका विशिष्ट फायनलच्या वेळी तर ती ८ महिन्यांची गरोदर असतानाही तिने माझे सामने पाहिले आणि २० वर्षांहून अधिक काळ ती माझ्यासोबत आहे.'