ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - एकेकाळी टेनिस जगतावर अधिराज्य गाजवणारा पण सध्या दुखापतींनी त्रस्त असलेला स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने दुखापतीमुळेच रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतूनन माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच यावर्षातील इतर कोणत्याही स्पर्धांमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. फेडररच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
१७ वेळा ग्रँडस्लॅम खिताब पटकावणारा फेडरर गेल्या काही काळापासून दुखापतींनी त्रस्त आहे. त्याच्या गुडख्याला जबर दुखापत झाली असून फेब्रुवारीमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्याचमुळे तो मे महिन्यातील फ्रेंच ओपन स्पर्धेलाही मुकला होता. त्यानंतर जून महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली. मात्र त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली असून परिणामी तो पुढील महिन्यात होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेला तसेच या मोसमातील इतर स्पर्धांनाही मुकणार आहे.