दोहा : दुखापतीतून सावरून १३ महिन्यांनी पुनरागमन केलेल्या टेनिस सम्राट रॉजर फेडररने एटीपी टूरमधील आपल्या २४व्या सत्राची दिमाखात विजयी सुरुवात केली. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात फेडररने ब्रिटनच्या डेन इवान्सचे कडवे आव्हान २-१ असे परतावले.
तीन सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर फेडररला दुसरा सेट गमवावा लागला. मात्र अखेरच्या सेटमध्ये फेडररने झुंजार खेळ करत इवान्सचे आव्हान ७-६, ३-६, ७-५ असे परतावले. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर फेडररच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. यानंतर ४०५ दिवसांनी फेडररने पहिला स्पर्धात्मक सामना खेळला.
निकोलोजचे आव्हान२० ग्रँडस्लॅम जिंकलेला दिग्गज फेडरर आता पुढील सामन्यात जॉर्जियाच्या निकोलोज बासिलाशविलीविरुद्ध भिडेल. निकोलोजने एकतर्फी झालेल्या सामन्यात ट्युनिशियाच्या मालेक जाजिरीचा ६-२, ६-२ असा पराभव करीत आगेकूच केली आहे. थिएमचा विजयस्पर्धेतील अव्वल मानांकित डॉमनिक थिएम याने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करत अस्लान करात्सेवचा ६-७, ६-३, ६-२ असा पराभव केला. अस्लानने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारत सर्वांना प्रभावित केले होते.