मेलबर्न : १७ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता आणि १७ व्या मानांकित स्टार खेळाडू रॉजर फेडररने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करतान आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. मात्र, यासाठी त्याला जागतिक क्रमवारीत २००व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या नोह रुबिनविरुद्ध झुंजावे लागले. त्याच वेळी, दुसरीकडे जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि ‘बर्थ डे’ गर्ल असलेल्या एंजलिका कर्बरनेदेखील विजय मिळवताना चांगलाच घाम गाळला.फेडररने रुबिनला सरळ तीन सेटमध्ये नमवले असले, तरी पहिल्या सेटमध्ये त्याला खूप झुंजावे लागले होते. एक वेळ तो पहिला सेट गमावण्याच्या स्थितीत होता. त्याचबरोबर तिसऱ्या सेटमध्येही त्याने आपली सर्विस गमावली होती. विशेष म्हणजे तिसरा सेट फेडररने टायब्रेकरमध्ये ७-३ असा जिंकला. फेडररने रुबिनचे आव्हान ७-५, ६-३, ७-६ असे परतावले. पुढच्या फेरीत फेडररपुढे झेक प्रजासत्ताकच्या १०व्या मानांकित टॉमस बर्डिचचे तगडे आव्हान असेल. फेडररलाही या आव्हानाची जाणीव असून यासाठी पूर्ण तयारी करुनच मैदानात उतरावे लागेल, असे फेडररने म्हटले. पुरुषांच्या अन्य लढतीत फेडररचा देशबांधव आणि माजी विजेता स्टेन वावरिंका यानेदेखील विजयी कूच करताना अमेरिकेच्या स्टिव्हन जॉनसनला ६-३, ६-४, ६-४ असे नमवले. तर, जपानचा पाचवा मानांकित केई निशिकोरीने आपली विजयी घोडदौड कायम राखताना फ्रान्सच्या जेरेमी चार्डी याला ६-३, ६-४, ६-३ असा धक्का दिला.चौथ्या फेरीत फेडररला ज्याचा सामना करायचा आहे, त्या बर्डिचलाही आगेकूच करण्यासाठी संघर्ष करावा लागला. अमेरिकेच्या रेयान हॅरिसनविरुध्द बर्डिचने ६-३, ७-६, ६-२ असा विजय मिळवला. पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर रेयाने दुसऱ्या सेटमध्ये बर्डिचला झुंजवले, परंतु दुसरा सेट मोक्याच्या वेळी जिंकल्यानंतर बर्डिचने वेगवान खेळ करताना विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)>‘बर्थ डे’ गर्ल कर्बरचा धडाकामहिला गटात ‘बर्थ डे’ गर्ल जर्मनीच्या कर्बरने आपला २९वा वाढदिवस धडाक्यात साजरा करताना आपल्याच देशाच्या करिना विथोइफ्टला ६-२, ६-७, ६-२ असा धक्का दिला. सामन्यात आघाडी मिळवल्यानंतर कर्बरला करिनाच्या चिवट खेळाला सामोरे जावे लागले. करिनाने बरोबरी साधल्यानंतर कर्बरने तुफान आक्रमण करताना आपला विजय निश्चित केला. १३वी मानांकित अमेरिकेची व्हिनस विलियम्स आणि ८वी मानांकित स्वेतलाना कुझनेत्सोवा यांनीही स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीतून मुख्य फेरी गाठलेल्या स्टेफनी वोगलेचा विलियम्सने ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला. चीनच्या दुआन यिंगयिंगचे पुढील फेरीत विलियम्सपुढे आव्हान असेल. तर, कुझनेत्सोवाने वाइल्ड कार्ड जेमी फोरलिसचा ६-२, ६-१ असा फडशा पाडला.भारतीयांची विजयी सलामी... जागतिक क्रमवारीतील अव्वल महिल दुहेरी खेळाडू सानिया मिर्झा आणि स्टार पुरुष दुहेरी खेळाडू रोहन बोपन्ना यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना महिला व पुरुष दुहेरीत विजयी सलामी दिली. सानियाने झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोवासह खेळताना ब्रिटनच्या जॅकलिन रे आणि अॅना स्मिथ यांना ६-३, ६-१ असे लोळवून दिमाखात आगेकूच केली. तसेच, पुरुष गटात बोपन्नाने उरुग्वेच्या पाब्लो कुवाससह खेळताना थॉमस बेलूची (ब्राझील) - मॅक्सिमो गोंजालिस (अर्जेंटिना) या जोडीचा ६-४, ७-६ असा पराभव केला. फ्रेंच ओपन विजेत्या गर्बाइन मुगुरुजाला तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी कडव्या झुंजीस सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या सामंता क्राफोर्डविरुध्द मुगुरुजाने ७-५, ६-४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.>लढवय्या मरे...जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अँडी मरे याने धडाक्यात दुसरी फेरी गाठताना रशियाच्या आंद्रे रुब्लेव याचा ६-३, ६-०, ६-२ असा फडशा पाडला. सामन्यावर एकहाती वर्चस्व राखलेल्या मरेने तुफानी खेळ करताना आंद्रेला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. तिसऱ्या सेटमध्ये मरेला टाचेला झालेल्या दुखापतीमुळे कोर्टवरच उपचार घ्यावे लागले. तरीही त्याने आपले नियंत्रण गमावले नाही. >हॅप्पी बर्थ डे टू यू...बर्थ डे गर्ल कर्बरने विजय मिळवल्यानंतर तील स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी एक सुरात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सामना जिंकल्यानंतर समालोचकाने तिची प्रतिक्रिया घेतानाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर उपस्थित प्रेक्षकांनाही शुभेच्छा देण्याचे आवाहन करताच सर्वांनी एकसुरात ‘हॅप्पी बर्थडे टू यू...’ गाणं गात कर्बरला शुभेच्छा दिल्या.>मी मोक्याच्यावेळी अनेक चुका केल्या. पण शेवटी मी विजयी होण्यात यशस्वी झाली. या कामगिरीमुळे मी खूश आहे.- एंजलिक कर्बरयंदाच्या स्पर्धेचा सोपा ड्रॉ नाही. बर्डिचने मला न्यूयॉर्क आणि विम्बल्डनमध्ये नमवले आहे. त्याशिवाय आॅलिम्पिकमध्येही त्याने मला धक्का दिला आहे. त्यामुळेच तो येथेही मला नमवण्याची इच्छा ठेवून असेल. - रॉजर फेडरर
रॉजर फेडररची झुंजार आगेकूच
By admin | Published: January 19, 2017 12:41 AM