Rohan Bopanna & Rutuja Bhosale win Gold medal in Mixed Doubles : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांचा सुपर शो सुरूच आहे. आज रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करत सोनेरी कामगिरी केली. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरी स्पर्धेत पहिला सेट सोडल्यानंतर उल्लेखनीय पुनरागमन करत विजयावर शिक्कामोर्तब केला. खरं तर ऋतुजाचे हे पहिले आशियाई खेळातील पदक आहे तर रोहन बोपण्णा २ वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता ठरला आहे.
चीनमधील हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारताची सुरूवात सुवर्ण पदकाने झाली. टेनिसमध्ये साकेथ मिनेनी आणि रामनाथन रामकुमार यांच्या रौप्य पदकानंतर मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने सोनेरी कामगिरी केली.
दरम्यान,आशियाई स्पर्धेच्या यंदाच्या पर्वातील भारताचे हे नववे सुवर्ण पदक ठरले आहे, तर भारताने एकूण ३५ पदके जिंकली आहेत. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने एन शो लिआंग आणि संग हाओ हुआंग यांचा पराभव करून देशासाठी या खेळांमध्ये नववे सुवर्ण जिंकले. भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण भारताला पहिल्या सेटमध्ये २-६ ने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले. दुसरा सेट भारतीय जोडीने जिंकला आणि तिसरा सेट टायब्रेकरवर पोहोचला. यासह भारताने हा सामना टायब्रेकरमध्ये १०-४ अशा फरकाने जिंकून देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले.