नवी दिल्ली : रोहन बोपन्नाने लिएंडर पेसचे आॅलिम्पिकचे स्वप्न भंग करण्याचा प्रयत्न करताना रिओ आॅलिम्पिकसाठी पुरुष दुहेरीच्या स्पर्धेत जोडीदार म्हणून साकेत मायनेनीची निवड केली, पण एआयटीएने मात्र त्याची मागणी फेटाळण्याची तयारी केली आहे. बोपन्नाने अव्वल १० मध्ये मानांकन मिळवत पुरुष दुहेरीत भारताला थेट प्रवेश मिळवून दिला. त्याने अलीकडेच एआयटीएला जोडीदाराबाबत आपली पसंती कळवली आहे. बोपन्नाने म्हटले की, ‘मी वैयक्तिक दुसऱ्या आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहे. याला मी विशेष सन्मान आणि जबाबदारी मानतो. थेट प्रवेशामुळे मला पुरुष जोडीदार निवडण्याची संधी मिळाली आहे. मला सर्वांकडून सहकार्य व शुभेच्छा अपेक्षित आहेत.’बोपन्नाने कुणा खेळाडूच्या नावाचा उल्लेख केला नाही, पण एआयटीएच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार बोपन्नाने २८ वर्षीय मायनेनी याला पसंती दर्शवली आहे. १८ ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणारा पेस वैयक्तिक सातव्या आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक आहे, पण बोपन्नाची पसंती लक्षात घेता त्याला भारताच्या दिग्गज टेनिसपटूच्या वैयक्तिक विक्रमाची पर्वा नसल्याचे स्पष्ट होते. सूत्राने दावा केला आहे की, एआयटीएने बोपन्नाची बाजू ऐकली असली तरी केवळ खेळाडूच्या अटी लागू राहणार नसल्याचे स्पष्ट आहे. एआयटीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पेस आॅलिम्पिकमध्ये खेळू शकला नाही ते केवळ बोपन्नामुळे, हे लोक विसरू शकणार नाही. त्याला टीकेला सामोरे जावे लागेल. आयटीएफच्या नियमांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, दुहेरीच्या संघाची निवड राष्ट्रीय महासंघातर्फे करण्यात येते. जोपर्यंत एआयटीएतर्फे मायनेनी व बोपन्ना यांना संघ म्हणून मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत त्यांना सहभागी होता येणार नाही. (वृत्तसंस्था)
रोहन बोपन्नाचा पेसला विरोध
By admin | Published: June 11, 2016 6:25 AM