नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या रोहिणी व मोनिका राऊत भगिनींनी रविवारी झालेल्या दिल्ली पूर्ण मॅरेथॉनमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले. पुरुष गटात पश्चिम रेल्वेच्या संतोष कुमारने विजेतेपद जिंकले. महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रच्या राऊत भगिनींनी कमाल दाखवली. रोहिणी राऊत हिने दोन तास ५० मिनिटे ४५ सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण करून विजेतेपद जिंकले. मोनिकाने दोन तास ५५ मिनिटे ४८ सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. ज्योती गवतेला (२ तास ५७ मि. १६ सेकंद) तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या दोघीही पुणे येथे अरविंद चव्हाण यांच्याकडे सराव करतात. पुरुषांच्या गटात संतोष याने दोन तास २० मिनिट ५१ सेकंदांची वेळ नोंदवली. सैन्यदलाच्या सुजित लुवांग याने दोन सात २१ मिनिट पाच सेकंदांत ही स्पर्धा पूर्ण केली. काही सेकंदांनी लुवांगचे विजेतेपद हुकले. सैन्यदलाच्याच राहुल पाल याने दोन तास २१ मिनिटे ४६ सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटात राकेश कुमार याने एक तास आठ मिनिट २२ सेकंदांची वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले. सत्येंद्र सिंह याने दुसरे आणि प्रदीप सिंह याने तिसरे स्थान पटकावले. महिलांमध्ये किरण सहदेव हिने एक तास १९ मिनिटे ५४ सेकंदांची वेळ नोंदवत हाफ मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले, तर मंजू यादव आणि मोनिका चौधरी या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. (वृत्तसंस्था)
रोहिणी-मोनिका राऊत भगिनींचे वर्चस्व
By admin | Published: February 29, 2016 2:35 AM