सिडनी : भारताच्या रोहित शर्माने आॅस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी संपलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक ४४१ धावा फटकावल्या. दरम्यान, अखेरच्या वन-डे लढतीत त्याने कारकिर्दीत पाच हजार धावांचा पल्ला गाठण्याची कामगिरी केली. रोहितने पाच सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत ४४१ धावा फटकावल्या. द्विपक्षीय मालिकेत त्याने दुसऱ्यांदा ४०० धावांचा टप्पा पार केला. त्याने दोन्ही वेळा ही कामगिरी आॅस्ट्रेलियाविरुद्धच केली आहे. यापूर्वी त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१३-१४ मध्ये अशी कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला यानेही द्विपक्षीय मालिकेत दोनदा असा पराक्रम केला आहे. अमलाने विंडीजविरुद्ध दोन्ही वेळा अशी कामगिरी केली. रोहितने पहिल्या दोन लढतीत शतके झळकावली, तर अखेरच्या लढतीत तो ९९ धावा काढून बाद झाला. ९९ धावा काढून बाद झाल्यामुळे रोहित निराश झाला होता, पण भारतीय संघाने विजय मिळविल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला, ‘‘आता मी निराश नाही. आम्ही विजयाला गवसणी घालण्यात यशस्वी ठरलो. मालिकेत चांगली कामगिरी केली, पण काही संधींचा आम्हाला लाभ घेता आला नाही. मालिकेत ०-४ ने पिछाडीवर असू, याचा कधी विचारही केला नव्हता. टी-२० मालिकेत सकारात्मक मनोधैर्यासह सहभागी होण्यासाठी या लढतीत विजय मिळवण्यास उत्सुक होतो.’’या मालिकेत पहिल्या दोन लढतीत रोहितने १७१ व १२४ धावांची खेळी केली, तर अखेरच्या वन-डे सामन्यात केवळ एका धावेने त्याचे शतक हुकले. तिसऱ्या व चौथ्या लढतीत त्याला मोठी खेळी करता आली नाही, पण अखेरच्या लढतीत त्याने ९९ धावांची खेळी करीत त्याची भरपाई केली. डावाच्या ३४ व्या षटकात रोहितने पाच हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा १२ वा खेळाडू ठरला आहे. रोहितने १४८ व्या सामन्यात पाच हजार धावांचा पल्ला गाठला. त्यात १० शतके आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था) मिळालेल्या संधीचा लाभ घेतला : मनीष पांडेसिडनी : मनीष पांडेने अखेरच्या वन-डे लढतीत नाबाद १०४ धावांची खेळी करीत पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देण्याच्या आॅस्ट्रेलियाच्या निर्धारावर पाणी फेरले. मिळालेल्या संधीचा लाभ घेतला असल्याची प्रतिक्रिया मनीष पांडेने दिली. मनीष पांडेला दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेच्या जागी संघात स्थान देण्यात आले. त्याने आपली निवड योग्य ठरवताना शानदार शतकी खेळी केली. पांडेने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना संघावर असलेल्या क्लीन स्वीपची नामुष्की टाळली. शतकी खेळी करणारा मनीष ‘मॅन आॅफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला. या खेळीबाबत आनंद व्यक्त करताना मनीष म्हणाला, ‘‘मला अजिंक्य दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात संधी मिळाली. या संधीचे सोने करताना मी मोठी खेळी केली. ३०० पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नसते, पण आम्ही दडपण न बाळगता लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरलो. विजयामुळे मालिकेचा शेवट करण्यात यशस्वी ठरल्यामुळे टी-२० मालिकेसाठी मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळणार आहे.’’ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या रोहित शर्माने मनीषच्या खेळीची प्रशंसा केली. रोहित म्हणाला, ‘‘शतक पूर्ण न करता आल्यामुळे निराश होतो, पण मनीषने शानदार खेळी करीत संस्मरणीय विजय मिळवून दिला. या विजयामुळे आनंद झाला.’’
रोहित मॅन आॅफ द सीरिज
By admin | Published: January 24, 2016 2:24 AM