ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १८ - तिरंगी एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताने रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या आधारे ५० षटकांमध्ये ८ बाद २६७ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने १३९ चेंडूत १३८ धावा केल्या असून त्याला सुरेश रैनाने (५१ धावा) मोलाची साथ देऊन भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
रविवारी तिरंगी मालिकेत भारताचा सामना यजमान ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक होती. शिखर धवन २ धावा, अजिंक्य रहाणे १२ आणि विराट कोहली अवघ्या ९ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ५९ अशी झाली होती. मात्र त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने सुरेश रैनाच्या साथीने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मिशेल स्टार्कने सुरैश रैनाला बाद करत ही जोडी फोडली. सुरेश रैना ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधाऱ महेंद्रसिंग धोनीने सावध खेळी करत ३१ धावांमध्ये १९ धावा केल्या. मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला व स्टार्कने त्याची विकेट घेतली. अक्षर पटेलही शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद २३७ अशी झाली. अखेरीस रोहित शर्माने आर. अश्विनच्या मदतीने भारताला २५० चा पल्ला गाठून दिला. रोहित शर्मा १३८ धावांवर असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शर्मा झेलबाद झाला. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यातील सहावे शतक ठोकून पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. तर भूवनेश्वर कुमारही भोपळा न फोडता माघारी परतला. शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांनी अचूक मारा करत भारतीय फलंदाजांना रोखले आणि ५० षटकांत भारताने आठ गडी गमावत २६७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मिशेल स्टार्कने १० षटकांत ४३ धावा देऊन भारताच्या सहा विकेट घेतल्या. तर गुरिंदर संधू आणि जेम्स फॉल्कनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.