मुंबई : ‘दुखापतीमुळे मी किती वेळ क्रिकेटपासून दूर राहीन याची मला काहीच कल्पना नाही. आमची बीसीसीआय मेडिकल टीम डॉक्टरांच्या संपर्कात आहे. आतापर्यंत जितके स्कॅन झालेत, ते डॉक्टरांना पाठविण्यात आले आहेत. जर शस्त्रक्रिया झाली, तर तीन ते साडेतीन महिने मी खेळू शकणार नाही,’ असे भारताचा आक्रमक स्टार फलंदाज रोहित शर्माने सांगितेले.मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना रोहित म्हणाला की, ‘आतापर्यंत सर्व काही स्पष्ट झालेले नाही. माझ्यामते एक-दोन दिवसांत शस्त्रक्रियेबाबतीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील. जर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असेल, तर तो महत्त्वपूर्ण निर्णय असेल. शस्त्रक्रिया झाल्यास मी साडेतीन महिन्यांपर्यंत खेळापासून दूर राहीन.’विशाखपट्टणम येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या व पाचव्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रोहितच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. दुखापतीविषयी रोहित म्हणाला की, ‘न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धाव घेताना माझ्या मांशपेशी ताणल्या गेल्या. त्यावेळी मला वाटले की, मी क्रीझपर्यंत पोहचू शकणार नाही आणि म्हणून मी झेप घेतली.’ (क्रीडा प्रतिनिधी)>शस्त्रक्रिया लंडनमध्ये ?आपल्या दुखापतीबाबत रोहित शर्मा पुढील आठवड्यात लंडनमध्ये एका विशेषतज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करवून घेऊ शकतो. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेलाही त्याला मुकावे लागेल. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘रोहित संभावित शस्त्रक्रियेसाठी पुढील आठवड्याच्या सुरुवातीला लंडनला जाईल. यामुळे त्याला कमीत कमी १० ते १२ आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागेल.
तीन महिने क्रिकेटला मुकणार : रोहित शर्मा
By admin | Published: November 05, 2016 5:25 AM