सुनील गावसकर लिहितात...यंदा आयपीएलमधील काही सामने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरत आहेत. खेळाडू, त्यांचे चाहते आणि प्रेक्षक यांना खिळवून ठेवण्यात आणि छातीचे ठोके चुकविण्याइतपत रोमहर्षकपणा यामुळे स्पर्धेची रंगत वाढतच चालली. मनीष पांडेच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे केकेआरने दिल्लीवर अखेरच्या षटकात मात केली. तो फार उपयुक्त खेळाडू आहे. पण राष्ट्रीय संघात खेळल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरीची त्याला जाणीव झाली. स्वत:ची किंमत वाढवायची असेल तर मोठी खेळी साकारायलाच हवी, या जाणिवेतून तो आता अलगद फटके मारायला शिकला आहे. या खेळीच्या बळावरच त्याने काही चेंडू शिल्लक राखून त्याने केकेआरला विजयी पथावर आणले. चॅम्पियन हैदराबादने घरच्या मैदानावर पंजाबला नमवीत आम्ही विजेते का आहोत, याची प्रचिती दिली. सामन्यात भुवनेश्वर कुमारचा निर्णायक टप्प्यातील यॉर्करचा मारा जगातील अन्य कुठल्याही गोलंदाजांपेक्षा कमी भेदक नव्हता. भुवनेश्वरचा मारा पाहिल्यानंतर मला आणखी एका गोलंदाजाची आठवण येते. तो म्हणजे मिशेल स्टार्क. भुवी आणि स्टार्क हे अनेक वर्षांपासून नव्या आणि जुन्या चेंडूने मारा करीत उपयुक्तता सिद्ध करीत आहेत.मुंबई इंडियन्सने संघात संतुलन साधले, शिवाय विदेशी खेळाडू बदलल्यानंतर यंदा एकापाठोपाठ एक विजय नोंदवीत आहे. साखळी लढती संपल्यानंतर प्ले आॅफ सुरू होईल तेव्हा आणखी काही दमदार खेळाडूंना संधी देण्याचा मुंबईच्या व्यवस्थापनाचा विचार असावा. रोहितला मागच्या सामन्यात सूर गवसल्याचे जाणवत होते, तरीही त्याने जोस बटलरच्या सोबतीने सरस सुरुवात करावी, अशी अपेक्षा राहील. रोहितने फिनिशरची गरज व्यक्त केली आहे. या कामासाठी तो स्वत: उपयुक्त ठरतो. दुसरीकडे कुणी जोस बटलरच्या करिअरवर नजर टाकल्यास दिसेल, की हा खेळाडूदेखील उपयुक्त फिनिशर आहे. बटलरची बॅट अद्याप तळपलेली दिसत नाही. तो फटके मारायला लागेल तेव्हा मात्र स्टॅन्डमधील चाहत्यांना चक्क हेल्मेट घालूनच बसावे लागेल. चेंडूवर तुटून पडला, की तोदेखील डिव्हिलियर्ससारखाच चौफेर फटके हाणतो.मनन व्होराने दमदार फलंदाजीच्या बळावर संघाला विजयासमीप आणले होते. अन्य युवा खेळाडूंसारखा मननदेखील या स्पर्धेत फटकेबाजीसाठी प्रख्यात बनला. ही चुणूक कायम राखल्यास मनन विजयावर शिक्कामोर्तब करणारा फलंदाज म्हणून पुढे येऊ शकतो. आज गुरुवारी पंजाबला विजयाची गरज आहेच. त्यांना पराभवातून बाहेर पडायचे असून, फॉर्ममध्ये असलेला मुंबई संघ त्यांना कसा थोपवू शकेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
‘फिनिशर’ची जबाबदारी रोहितनेच स्वीकारावी!
By admin | Published: April 20, 2017 2:46 AM