बँकॉक : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा समावेश असलेली भारतीय पुरुषांची जोडी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्य सामन्यात दाखल झाली. पण बी. साई प्रणीतच्या पराभवामुळे शुक्रवारी एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.भारतीय जोडीने उपांत्यपूर्व सामन्यात कोरियाचेचोई सोलग्यू आणि सियो सेयूंग यांचा पराभव केला. बिगर मानांकित भारतीय जोडीने शुक्रवारी एक तासपर्यंत चाललेल्या सामन्यात २१-१७, १७-२१, २१-१९ अशा फरकाने सामना जिंकला. कोरियाच्या या जोडीवर रंकीरेड्डी- शेट्टी यांचा हा पहिलाच विजय होता. विश्व क्रमवारीत १६ व्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीला अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी कोरियाच्या आणखी एका जोडीला पराभूत करण्याचे आव्हान असेल. शनिवारी रंकीरेड्डी- शेट्टी यांचा सामना सूंग हृून- शिन बॅक शेओल यांच्याविरुद्ध होणार आहे.
प्रणीतला एकेरीत जपानच्या कांता सुनेयामाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. प्रणीतने उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या गेममध्ये सुनेयामाला आव्हान दिले, पण दुसऱ्या गेममध्ये त्याला सातव्या मानांकित खेळाडूविरुद्ध लढत देता आली नाही. या लढतीत प्रणीतला १८-२१, १२-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.