ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10- आयपीएलचे सामने दुसऱ्या राज्यात गेले तरी चालतील. मात्र यासाठी सरकार पाणी देणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे... परंतु मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी कुरघोडी केली आहे. भाजपचे खासदार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांनाच घरचा आहेर दिला. आयपीएलचे सामने राज्याबाहेर गेल्यास महाराष्ट्राला तब्बल १०० कोटींच्या महसुलास मुकावे लागणार असल्याचं यावेळी अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे. आयपीएलच्या महसुलाचा वापर दुष्काळी भागासाठी करण्याचा सल्लाही यावेळी अनुराग ठाकूर यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या एका माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकूर माहिती तंत्रज्ञानविषयक संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात मैदानावर पाण्याची नासाडी करणाऱ्या आयपीएल सामन्यांना न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या सामन्यांना न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवला असला तरी त्याबाबतची पुढील सुनावणी मंगळवारी, १२ एप्रिल रोजी होणार आहे. यंदाच्या हंगामात महाराष्ट्राला १०० कोटींचा महसूल मिळणार असून या निधीचा उपयोग राज्याला दुष्काळी भागासाठी करता येईल, असे ठाकूर म्हणाले. आयपीएलच्या मागील हंगामात मिळालेल्या महसुलाच्या आकडेवारीच्या अभ्यासावरून सद्यस्थितीतील महसुलाची आकडेवारी आपण मांडत आहोत, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. आयपीएलमधील फ्रॅन्चाईझींनाही येत्या आठवडय़ात त्यांना मिळणाऱ्या महसुलाचा उपयोग कसा करतील याविषयी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याचे बीसीसीआय सचिवांनी अखेरीस स्पष्ट केले. शनिवारपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या नवव्या हंगामातील एकंदर २० सामने राज्यात खेळवले जाणार आहेत.
आयपीएल सामने बाहेर हलवल्यास राज्याला १०० कोटींचा तोटा
By admin | Published: April 10, 2016 11:18 AM