सातारा, दि. ३१ -ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ कुस्ती संकुल उभारण्यासाठी खाशाबा यांना मिळालेलं ऑलम्पिक मेडलच लिलावात काढण्याचा निर्णय खाशाबा यांचा मुलगा रणजित जाधव यांनी 'लोकमत'मधून जाहीर केला होता. या बातमीनं क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाल्यानंतर क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सोमवारी यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन कुस्ती संकुलासाठी 3 कोटी रुपये निधी जाहीर केला. सोबतच खाशाबा यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राला शिफारस करेल, अशी घोषणाही केली. वारंवार आश्वासन देऊनही गेली 8 वर्ष ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ घोषणा केलेल्या कुस्ती संकुलाची वीट उभारली जात नसल्याची बाब 'लोकमत'ने उजेडात आणली होती.क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेंल्या या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, पै. खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव आणि गावातील इतर नागरिक उपस्थित होते. गेल्या 3 वर्षांपासून बंद पडलेली खाशाबा जाधव राज्य चषक कुस्ती स्पर्धा यावर्षीपासूनच सुरू करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली. कुस्ती संकुल उभारल्यानंतर त्याच्या देखभालीचा खर्च उचलण्याची तयारी डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केली.
पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलसाठी शासनाकडून तीन कोटी रुपये मंजूर !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 6:48 PM