ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - युवा फलंदाज रुद्र धांडे याने मुंबई क्रिकेटमध्ये नवा विक्रमाची नोंद करताना टी२० क्रिकेटमध्ये केवळ ६७ चेंडूंत नाबाद द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. माटुंगा जिमखाना येथे सुरू असलेल्या मुंबई विद्यापीठ अबिस रिझवी चॅम्पियन्स ट्रॉफी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत रुद्र याने आपला रुद्रावतार दाखवताना आपला झंझावात सादर केला. मुंबई विद्यापीठाच्या वतीने आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत रिझवी महाविद्यालयाकडून सलामीला खेळणाऱ्या रुद्रने मालाडच्या प्रल्हादराय दालमिया महाविद्यालयाविरुद्ध हा विक्रम रचला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या रिझवीने रुद्रच्या या वादळी खेळीच्या जोरावर 20 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 322 धावांचा एव्हरेस्ट उभारला. रुद्रने समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला मजबूत चोपताना 39 चेंडूत शतक साजरे केले. यानंतर त्याने आणखी रुद्रावतार धारण करताना दालमिया संघाच्या गोलंदाजांना पार बेजार केले. रुद्रने आपल्या खेळीदरम्यान 21 चौकार आणि तब्बल 15 उत्तुंग षटकार ठोकत नाबाद 200 धावांसह द्विशतक केले. दरम्यान, या भल्यामोठ्या धावसंख्येपुढे आणि रुद्रच्या जबरदस्त धुलाईनंतर आधीच मानसिक खच्चीकरण झालेल्या दालमिया संघ जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा त्यांचा डाव 10.2 षटकात अवघ्या 75 धावांमध्ये गडगडला. यासह रिझवी संघाने तब्बल 247 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. व्यावसायिक टी-20मध्ये सर्वोच्च धावसंख्या वेस्ट इंडिजचा विध्वंसक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर असून त्याने 2013 साली पुणे वॉरियर्सविरुद्ध रॉयल चँलेंजर्स बँगलोरकडून खेळताना 66 चेंडूत 175 धावांची खेळी केली होती. त्याचवेळी, गतवर्षी दिल्लीच्या मोहित अहलावत याने टी-20 मधील पहिले त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. मात्र, त्याने ज्या मैदानावर ही खेळी केली होती ते मैदान आकाराने लहान होते. त्याउलट रुद्रने अशा मैदानावर द्विशतक ठोकले, जेथे एमसीएच्या निवड समितीच्या स्पर्धा आयोजित होतात. ........................................आई -वडिलांना परफेक्ट गिफ्ट...ही धमाकेदार खेळी रुद्रने आपल्या आ -वडिलांच्या नावे करताना सांगितले की, माझ्या आई - वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या एकदिवस आधी ही खेळी केल्याने मी खूप खूश आहे. ही खेळी त्यांच्यासाठी परफेक्ट गिफ्ट आहे. या खेळीनंतर मी निशब्द असून माझ्याकडून असा पराक्रम झाल्याचा विश्वास बसत नाही............................................- या द्विशतकाआधी रुद्रने मुंबईत १९ वर्षांखालील स्पर्धांमध्ये एकूण ५ शतके झळकावली आहेत. - रुद्रचे वडिल कस्ट्म्समध्ये नोकरीला असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.
रुद्रनं ६७ चेंडूंत झळकावले द्विशतक
By admin | Published: May 11, 2017 9:52 PM