मुंबई : येथील बॉम्बे जिमखाना येथे गुरुवापासून रंगणाऱ्या राष्ट्रीय ज्यूनिअर रग्बी अजिंक्यपद स्पर्धेसाठी यजमान महाराष्ट्राच्या मुलांच्या व मुलींच्या संघाची घोषणा झाली. शेहबाझ कपूर आणि शिखा ठक्कर या मुंबई उपनगरच्या खेळाडूंकडे अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या संघाची धुरा सोपविण्यात आली आहे.गेल्यावर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र, यंदा घरच्या मैदानाचा फायदा उचलून विजेतेपदाचा निर्धार महाराष्ट्राच्या संघाने केला आहे. मुलांच्या ‘ई’ गटात समावेश असलेल्या महाराष्ट्रापुढे गटसाखळी सामन्यांत जम्मू - काश्मिर आणि छत्तीसगड यांचे आव्हान असेल. दुसरीकडे, मुलींमध्ये महाराष्ट्राचा समावेश ‘ड’ गटात असून यामध्ये केरळ आणि आंध्र प्रदेशचे कडवे आव्हान यजमानांपुढे असेल. महाराष्ट्राच्या मुलींची सलामीची लढत केरळ विरुध्द होणार असून यानंतर दुपारी आंध्र प्रदेशविरुध्द यजमानांचा दुसरा सामना होईल. विशेष म्हणजे ही स्पर्धा मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची असून या स्पर्धेतून यावर्षी दुबई येथे होणाऱ्या आशियाई ज्यूनिअर १८ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होईल. दोन्ही गटात मिळून एकूण ३० संघांचा या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभाग मिळाला असून यामध्ये यजमान महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तिसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, दमण, उत्तराखंड, बिहार आणि जम्मू - काश्मिर यांचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)महाराष्ट्राचे संघ :मुले : शेहबाझ कपूर (कर्णधार), अक्रम शेख, वसिम खान (सर्व मुंबई उपनगर), सागर सिंग, ईश्वर राठोड, किशोर चव्हाण (सर्व मुंबई शहर), खेम थापा, विकास धुरिया, अभिषेक यादव, बबलू यादव (सर्व ठाणे), प्रशांत कांबळे, श्रीधर निगडे (दोघेही कोल्हापूर). प्रशिक्षक - विकास चौरासियामुली : शिखा ठक्कर (कर्णधार), रिया कुटिन्हो, श्रीया शेट्टी, गार्गी वाळेकर, क्षितिजा मंगळुरकर, ॠतुजा मंगळुरकर, श्रध्दा लावंड (सर्व मुंबई उपनगर), हिमयावती गवती, देवयानी मोहोपे (दोघीही ठाणे), पायल कनोजिया (मुंबई शहर), प्रियांका बैस, रशी शिंदे (दोघीही गोंदिया). प्रशिक्षक - रेहमुद्दिन शेख.
आजपासून मुंबईत रग्बीचा थरार
By admin | Published: October 20, 2016 4:14 AM