नवी दिल्ली : भारताच्या साकेत मायनेनी याला आज येथे दिल्ली ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या स्टीफन रॉबर्टने साकेतवर ६-३, ६-० असा सहज विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली.भारतीय खेळाडू रॉबर्टला कडवी झुंज देऊ शकला नाही. त्यामुळे फ्रान्सच्या खेळाडूला हार्डकोर्टवरील त्याचे पहिले चॅलेंजर विजेतेपद पटकावण्यास फारसे कष्ट लागले नाही.रॉबर्टने आतापर्यंत त्याचे सर्वच विजेतेपद हे हार्डकोर्टवर जिंकलेले आहेत. २०१० मध्ये ६१ व्या स्थानावर असणाऱ्या रॉबर्टने आॅस्ट्रेलिया ओपनच्या तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याला जगातील २५ व्या मानांकित गेलमोनफिल्सने पराभूत केले होते.रविवारी झालेल्या फायनलमध्ये साकेतची सुरुवात चांगली झाली नाही. त्याने सुरुवातीला दोन ब्रेकपॉइंट वाचविल्यानंतर आपली सर्व्हिसही वाचवली. भारतीय खेळाडू त्याच्या मजबूत सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहे; परंतु आज त्याने निराश केले आणि त्याचे शॉटदेखील दमदार नव्हते.मायनेनी हा कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करीत होता; परंतु सहाव्या आणि सातव्या गेमदरम्यान त्याने ५ गुण गमावले. त्यामुळे तो पूर्णपणे बॅकफूटवर ढकलला गेला. भारतीय खेळाडूने त्यानंतर सलग १० गेम आणि त्यानंतर सामनाही गमावला. या विजयाबरोबरच रॉबर्टला ७,२०० डॉलर बक्षीस रक्कम आणि ४० रँकिंग गुण मिळाले. मायनेनीला ४८ रँकिंग गुण मिळाले आणि कारकिर्दीत प्रथमच जगातील अव्वल १५० मध्ये पोहोचण्याची त्याची आशा वाढली. रविवारी पुरुष एकेरीच्या फायनल सामन्यानंतर तो म्हणाला, ‘‘मला माझा हात आणि हालचाली याविषयी काल सायंकाळपासूनच समस्येचा सामना करावा लागत होता. मी फटका मारण्याच्या स्थितीत येण्याचा प्रयत्न करीत होतो; परंतु माझ्या परिस्थितीमुळे असे करणे कठीण झाले. मला अतिरिक्त प्रयत्न करावा लागला. ही लढत संघर्षपूर्ण होती.’’साकेत मायनेनी याला पुरुष दुहेरीतही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या महेश भूपतीने युकी भांबरी याच्या साथीने साकेत मायनेनी आणि सनमसिंह यांना ६-३, ४-६, १०-५ असे पराभूत करीत पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावले होते.(वृत्तसंस्था)युरोपियन स्वार्थी, भारतीयांत प्रेम, दया : रॉबर्टदिल्ली ओपन चॅम्पियन स्टीफन रॉबर्ट याने जीवनात टेनिसच नव्हे, तर ‘आंतरिक शांती’ सर्वात महत्त्वपूर्ण बाब असल्याचे सांगितले. भारतीयांत प्रेम आणि दया यामुळे प्रभावित रॉबर्टने या देशाचा दौरा पुन्हा करण्याची इच्छा व्यक्त केली.दिल्लीतील आपल्या अनुभवाविषयी तो म्हणाला, ‘‘रस्त्यांवर थोडी गर्दी आहे; परंतु लोकांमध्ये दया आहे. एक व्यक्ती काही विकत होता आणि दुसरा त्याच्याजवळ जाऊन खरेदीआधी बोलत होता, हे मी पाहिले.येथील लोकांमध्ये आत्मीयता आहे. युरोपमध्ये असे नाही. तेथे स्वार्थीपणा आहे. मी प्रत्येकात हे प्रेम पाहणे पसंत करतो. युरोपात हे प्रेम फक्त त्यांच्या कुटुंबांपर्यंत मर्यादित आहे; परंतु अन्य लोकांसाठी नाही.’’
भारताच्या साकेत मायनेनीला उपविजेतेपद
By admin | Published: February 22, 2016 3:49 AM