विश्वास चरणकर - कोल्हापूरअकराव्या विश्वचषक स्पर्धेला दहा दिवसानंतर सुरूवात होत आहे, या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी सर्व संघ जिवाची बाजी लावतील. यंदाच्या स्पर्धेसाठी कशी आहे त्यांची तयारी आणि मागील स्पर्धांमध्ये त्यांनी काय केला होता पराक्रम याविषयीची माहिती आजपासून....क्रिकेट जगतातील सर्वात चिवट म्हणून ओळखला जाणारा आणि गेल्या दोन विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेला श्रीलंकेचा संघ यंदा फायनलमध्ये पोहचण्याची हॅटट्रीक करायची आणि त्यानंतर विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न बाळगून आहे. पण हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला बरेच कष्ट करावे लागतील.१९२६-२७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या श्रीलंका संघाला १९८१ मध्ये कसोटीचा दर्जा मिळाला. कसोटी खेळणारा तो आठवा देश बनला. १९९0 नंतर या संघाने आंतराष्ट्रीय क्षितिजावर आपली चमक दाखविण्यास प्रारंभ केला. तो पर्यंत हा संघ लिंबू-टिंबू म्हणूनच ओळखला जाईल. पण अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा या दोघांच्या कारकिर्दीत श्रीलंकेने गरुड भरारी घेतली. सलामीवीर सनथ जयसूर्याने या स्पर्धेतून एकदिवसीय क्रिकेटला आधुनिक चेहरा दिला. पहिले १0-१५ षटके सर्व संघ विकेट शाबूत ठेवून सावध सुरवात करण्यावर भर देत होते. पण जयसुर्या-कालुविथरणा या जोेडीने पहिल्या चेंडूपासून तोडफोड फलंदाजी करण्याचा नवा पायंडा पाडला. याच्या जोरावर १९९६ला हा संघ विश्वविजेता बनला. त्यानंतर दोनदा अंतिम फेरी गाठूनही त्यांना विश्वविजयाची पुनरावृती करता आलेली नाही.‘तरुण तुर्का’वरच भरवसा२७ वर्षी अष्टपैलू अँजेला मॅथ्थ्यूजच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेचा संघ यंदाच्या विश्वचषकात सहभागी होत आहे. संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा असला तरी त्यांची खरी मदार कुमार संगक्कारा आणि महेला जयवर्धने या दोन दिग्गजांवर प्रामुख्याने असणार आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या वनडे मालिकेत या संघाला पराभव पत्करावा लागला होता. पण हा संघ केव्हाही भरारी मारु शकतो. मालिकेतील शेवटचा सामना जिंकल्यामुळे विजयाची पायधूळ घेवून ते स्पर्धेत उतरत आहेत. या सामन्यात संगक्काराने शतक झळकावल्यामुळे त्यांना विजय मिळविला. यावरुनच त्यांचा संघ या दोन शिलेदारांवर किती अवलंबून आहे ते दिसून येते. विश्वचषकात सहभागी संघांपैकी श्रीलंकेचा संघाचे सरासरी वय सर्वात जास्त आहे. ३७ वर्षीय संगक्कारा - जयवर्धने जोडीने अनेक वर्षे श्रीलंकेसाठी प्रतिनिधीत्व केले असून ते दोघेही या स्पर्धेनंतर निवृत्त होत आहेत. या दोघांबरोबरच ३८ वर्षीय तिलकरत्ने दिलशान याचाही हा शेवटचा वर्ल्डकप असेल, त्यांना विश्वविजय निरोप दिल्यास यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? आगळा-वेगळा गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यावर श्रीलंकन आक्रमणाची भिस्त आहे.पण कुलसेकरा, धम्मिका प्रसाद हे तितके निष्प्रभ ठरत असल्याने संघाची कामगिरी ढासळत आहे. श्रीलंकेचे ब्रम्हास्त्र समजला जाणारा मुथैय्या मुरलीधरनची जागा भरुन काढणारा गोलंदाज अजून श्रीलंकेला गवसलेला नाही. ३६ वर्षीय रंगना हेराथ तो प्रयत्न करीत असला तरी त्याला अजून हुकमी एक्का बनता आलेले नाही. नव्या फळीतील गुणवान खेळाडूंचा स्त्रोत आटल्यामुळे श्रीलंकेला ‘तरुण तुर्का’वरच रेस खेळावी लागणार आहे.१९९६ श्रीलंकेचा संघ या स्पर्धेचा सहयजमान होता. त्यामुळे त्यांचे सामने त्यांना मायदेशात खेळण्याची संधी मिळाली, पण कोलंबोत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघाने श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. या सामन्यातील गुण श्रीलंकेला बहाल करण्यात आले. त्यामुळे एकही चेंडू न खेळता श्रीलंका संघाने स्पर्धेची बाद फेरी गाठली होती. या पुण्याईवर त्यांनी भारताविरुध्द कोलकात्यातील तो ऐतिहासिक सामना जिंकला आणि अंतिम फेरीसाठी लाहोर गाठले तेथे त्यांनी आॅस्ट्रेलियाला हरवून पहिले विश्वविजेतेपद मिळविले. १९९९ गेल्या स्पर्धेतील विश्वविजेता म्हणून श्रीलंकेकडून या सामन्यात अपेक्षा वाढल्या होत्या, पण या श्रीलंकेने इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत निराशा केली. त्यांना केवळ झिम्बाव्वे आणि केनिया या दुबळ्या संघांवरच विजय मिळविता आला. विश्वविजेते सुपरलीगमध्ये न पोहचताच माघारी फिरले.१९७५ पहिल्या विश्वचषकात श्रीलंकेने आपला पहिला सामना वेस्ट इंडीजबरोबर खेळला. यात त्यांना केवळ ८६ धावाच करता आल्या. या पहिल्या स्पर्धेत श्रीलंका संघ एकही सामना न जिंकता मायदेशी परतला होता.१९७९ दुसऱ्या विश्वचषकात श्रीलंकेचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. पण यावेळी त्यांच्यादृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना एकदिवसीय सामन्यात पहिला वहिला विजय नोंंदविता आला. त्यांनी भारताला हरवून आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे भारतीय संघाला या स्पर्धेत एकही सामना न जिंकता परतावे लागले होते.१९८३या विश्वचषकात श्रीलंकेला एकच विजय मिळविता आला. न्यूझीलंडवरील एकमेव विजयानिशी ते साखळी फेरीत गारद झाले.१९८७इंग्लंड बाहेर खेळविण्यात आलेल्या या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला मनासारखी कामगिरी करता आली नाही. त्यांना पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्याकडून पराभूत होवून रिकाम्या हाताने परतावे लागले.१९९२ आॅस्ट्रेलियात झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका संघावर विजय मिळविला तर भारताविरुध्दचा त्यांचा सामना टाय झाला. पण येथेही त्यांना सेमीफायनल गाठता आली नाही.२00३ दक्षिण आफ्रिकामध्ये झालेल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीत केनियासारख्या दुबळ्या देशाकडून पराभूत होवूनही श्रीलंकेने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. पण तेथे आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.२00७ वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या या स्पर्धेत श्रीलंकेने अंतिम फेरी गाठली परंतु आॅस्ट्रेलियाने त्यांना दुसऱ्यांदा विश्वचषक उचलण्यापासून रोखले.२0११ स्पर्धेचे सहयजमान असलेल्या श्रीलंकेने मायदेशातील आपल्या प्रवासात फायनलपर्यंत मजल मारली. सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचलेला श्रीलंका संघ भारताविरुध्द मुंबईत झालेला अंतिम सामना हरला आणि त्याचे दोनदा विश्वविजेता होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले.
उपविजेत्या श्रीलंकेचे लक्ष्य जेतेपदाकडे
By admin | Published: February 04, 2015 1:58 AM