रिओ : आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर अतिशय चुरशीच्या आणि क्षणोक्षणी रोमांच उभे करणाऱ्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूला हरवले खरे पण रौप्य मिळवणारी सिंधूच तमाम भारतीयांसाठी ‘गोल्डन गर्ल’ बनली. आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमान मिळवणारी सिंधू रौप्यपदकाची मानकरी ठरली. वर्ल्ड चॅम्पियनच्या थाटात खेळणारी कॅरोलिना जिंकल्यानंतर सिंधूच्या थेट गळ्यातच पडली अन् सिंधू हारूनही जिंकली. सिंधूची पिछाडीवरून आघाडीशुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्या गेममध्ये मारिनने आक्रमक खेळाने सुरुवात केली. तिने पहिल्या पॉइंटपासूनच आघाडी घेतली. सिंधूने तिला गाठण्याचा खूपवेळा प्रयत्न केला, परंतु जोरदार स्मॅश लगावत मारिन पुढेच जात होती. सिंधू १६ पॉइंटवर असताना मारिन गेम पॉइंटपासून केवळ दोन पॉइंट मागे म्हणजे १९ गुणांवर होती. पण यानंतर सिंधू सुसाट सुटली. तिने सलग पाच गुण घेत २१-१९ असा गेम जिंकला. पहिला गेम जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. गेम जिंकला असला तरी सिंधूने यामध्ये काही चुकाही केल्या; शिवाय तिचे एक रेफरल वाया गेले.मारिनचे पुनरागमनपहिल्या गेममध्ये अचानक झालेल्या आक्रमणामुळे गोंधळून गेलेल्या मारिनने दुसऱ्या गेममध्ये आपल्या रणनीतीत बदल केला. स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत तिने आपली आघाडी वाढवण्याकडे लक्ष दिले. सिंधूला फोरहँड, बॅकहँडच्या जोरदार फटक्यांनी जेरीस आणीत मारिनने हा सेट २१-१२ असा सहज जिंकला. निर्णायक तिसरा गेमसामन्यात बरोबरी साधल्याने उत्साहित झालेल्या मारिनने तिसऱ्या आणि निर्णायक सेटची सुरुवातही आक्रमक केली. मारिनने पाच पॉइंटची कमाई केली त्या वेळी सिंधूचा एक पॉइंट झाला होता. पण सिंधूने दबाव न घेता ही आघाडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. तिच्या या प्रयत्नांनी तिने दहाव्या पॉइंटवर बरोबरी साधली; पण यानंतर मारिनने १४-१0 अशी आघाडी साधली. अकराव्या पॉइंटच्या वेळी मारिनचा पाय मुरगळला; पण तिने लगेच सामन्यात पुनरागमन केले. यानंतर तिने सिंधूला फारशी संधी न देता विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना १ तास २३ मिनिटे चालला.आजचा दिवस तिचा होता - सिंधूआॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे माझे मुख्य ध्येय पूर्ण झाले असल्यामुळे मी खूप आनंदीत आहे. मला पदक जिंकल्याचा अभिमान आहे. अंतिम फेरीत पोहोचल्यावर खर तर माझे लक्ष सुवर्णपदकावर होते आणि त्यासाठी मी खूप पर्यत्न केले. पण मला अपयश आले. आजचा दिवस कॅरोलिनाचा होता. ती खरच चांगली खेळली. माझ्याकडूनही काही चूका झाल्या. शेवटी तीने जास्त जलद आणि आक्रमक खेळ केल्यामुळे मला पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममधला विजयीे फॉर्म मी टिकवू शकले नाही. दुसऱ्या गेममध्ये बरोबरी साधूनही मी त्याचा फायदा घेऊ शकले नाही. आता घरी जाऊन काही दिवस आराम करणार आणि त्यानंतर गोपिचंदसरांच्या मार्गदर्शनाने सरावाचे नियोजन करणार. पण काही दिवस पदकाचा आंनद साजरा करणार आहे.
कॅरोलिनाने मारली मिठी विजयाने भारावरून कोर्टवर झोपलेल्या कॅरोलिना जवळ जाऊन तीच्या हाता धरून तीला उठविले आणि तिला मिठी मारत तीचे अभिनंदन केले. सिंधूने दाखविलेल्या खिलाडूवृत्तीचे चाहत्यांनी उभे राहून कौतूक केले. जिगरबाज खेळीअंतिम सामन्यात पराभूत झाली असली तरी सिंधूने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करून सव्वाशे कोटी भारतीयांची मने मात्र जिंकली आहेत. जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला कांस्यपदक मिळाले. चौथे रौप्यपदक : सिंधूने आज मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे आॅलिम्पिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड (अथेन्स २00४), विजयकुमार (लंडन २0१२) आणि मल्ल सुशीलकुमार (लंडन २0१२) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत.पदक विजेती पाचवी महिला : सिंंधू आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरी, मेरि कोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. पण सिंधूने यापुढे जात रौप्यपदकाची कमाई केली.माझ्यामते मी एक आठवडापूर्वीच्या तुलनेत आज जास्त आनंदी आहे. सिंधू खूप चांगली खेळलीस. तू माझ्यासाठी प्रेरणा आहेस. - अभिनव बिंद्रा, नेमबाजभारताची सर्वात युवा आॅलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू शानदार खेळली. तू आपल्या दिमाखदार खेळाने आमची सर्वांची मने जिंकलीस. - सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटूपी. व्ही. सिंधू जबरदस्त. खूप छोटे अंतर विजेता आणि अंतिम फेरीत पोहचणाऱ्या खेळाडूला वेगळे करतं. आम्हाला तुझा गर्व आहे. या रौप्य पदकाचा आनंद घे. यावर तुझा हक्क आहे.- विश्वनाथन आनंद, बुध्दिबळपटू