शिवाजी गोरे - पुणेआंद्रे रसेलच्या (दोन विकेट, दोन झेल व अर्धशतकी खेळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा १३ चेंडू व ४ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या आठव्या पर्वांत दुसरा विजय मिळवताना गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा गोलंदाज संदीप शर्माने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना २५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले पण त्याची ही कामगिरी अखेर व्यर्थच ठरली. किंग्स इलेव्हन संघाला या स्पर्धेत तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. केकेआरने किंग्स इलेव्हनचा डाव ९ बाद १५५ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १७.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाची ५ बाद ६० अशी अवस्था झाली होती, पण कॅरेबियन अष्टपैलू रसेलने फलंदाजीमध्ये छाप सोडताना ३६ चेंडूंना सामोरे जात ९ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ६६ धावा फटकावल्या. त्याने युसूफ पठाणच्या (नाबाद २८) साथीने सहाव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.त्याआधी, कर्णधार जॉर्ज बेली याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर किंग्स इलेव्हन पंजाबने खराब सुरुवातीनंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ९ बाद १५५ अशी आव्हानात्मक मजल गाठली. गतचॅम्पियन केकेआरविरुद्ध अखेरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी बेलीने ४५ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ६० धावा ठोकल्या. ग्लेन मॅक्सवेलने ३३ धावांचे महत्वाचे योगदान दिले. केकेआरतर्फे उमेश यादव याने ३३ धावा देत तीन बळी घेतले.किंग्स इलेव्हन पंजाब : मुरली विजय झे. रसेल गो. उमेश ००, वीरेंद्र सेहवाग झे. चावला गो. रसेल ११, रिद्धिमान साहा झे. पठाण गो. मोर्केल १५, ग्लेन मॅक्सवेल झे. रसेल गो. उमेश ३३, जॉर्ज बेली धावबाद ६०, तिसारा परेरा झे. पांडे गो. रसेल ९, गुरकिरत मानसिंग झे. सूर्यकुमार गो. उमेश ११, अक्षर पटेल झे, सूर्यकुमार गो. नरेन २, मिशेल जॉन्सन झे. गंभीर गो. मोर्केल १, अनुरितसिंग नाबाद ००, अवांतर :१३, एकूण : २० षटकांत ९ बाद १५५ धावा. गडी बाद क्रम : १/०, २/२३, ३/२७, ४/९०, ५/१०७, ६/१२९, ७/१४६, ८/१५४, ९/१५५. गोलंदाजी : उमेश यादव ४-०-३३-३, मोर्ने मोर्केल ४-०-२७-२, आंद्रे रसेल ४-०-३९-२, सुनील नरेन ४-०-१९-१, पीयूष चावला ४-०-२७-०.कोलकाता नाईटरायडर्स :- रॉबिन उथप्पा पायचित गो. संदीप शर्मा १३, गौतम गंभीर झे. साहा गो. संदीप शर्मा ११, मनीष पांडे झे. बेली गो. संदीप शर्मा १२, सूर्यकुमार यादव झे. साहा गो. परेरा २३, युसूफ पठाण नाबाद २८, रॅनटेन डोएसे पायचित गो. संदीप शर्मा ००, आंद्रे रसेल त्रि. गो. जॉन्सन ६६, पीयूष चावला नाबाद ०४. अवांतर (२). एकूण १७.५ षटकांत ६ बाद १५९. बाद क्रम : १-१६, २-३४, ३-६०, ४-६०, ५-६०, ६-१५५. गोलंदाजी : संदीप शर्मा ४-१-२५-४, अनुरित ४-०-३७-०, जॉन्सन ३.५-०-४१-१, परेरा ४-०-३३-१, पटेल २-०-२२-०.