Russia Ukraine War Crisis : गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठं युद्ध सुरू आहे. रशियाने आपलं सैन्य युक्रेनमध्ये घुसवून लष्करी हल्ला केल्याच्या बातम्यांनी साऱ्या जगात खळबळ माजली आहे. दोन युरोपीय देशांमधील या संघर्षाचा प्रत्येक क्षेत्रावर व्यापक परिणाम झाला आहे. शांततेच्या मार्गाने तोडगा काढा आणि युद्ध थांबवा अशा आशयाचे सल्ले जगभरातून दिले जात आहेत. क्रीडाक्षेत्रही यास अपवाद राहिलेला नाही. दोन दिवसांपूर्वी फुटबॉलच्या मैदानात युक्रेनच्या एका खेळाडूने युद्ध थांबवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता रशियाच्या एका टेनिसपटूने 'युद्ध करू नका.. हे सगळं थांबवा', अशी भावनिक साद घातली आहे.
सध्या सुरू असलेल्या दुबई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत शुक्रवारी संध्याकाळी रशियन टेनिस स्टार आंद्रे रुबलेव्हने विजय मिळवला. या विजयानंतर त्याने आपल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना एक भावनिक साद घातली. रुबलेव्हने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी टेनिस सामान्यातील एक परंपरेचा वापर केला. सामान्यपणे टीव्ही कॅमेराच्या लेन्सवर टेनिसपटू बहुतांश वेळा काहीतरी संदेश लिहितात. तीच पद्धत वापरत 'नो वॉर प्लीज' असं त्याने कॅमेरा लेन्सवर लिहिलं. त्याचा हा भावनिक व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, रुबलेव्हने उपांत्य फेरीत पोलंडच्या हुबर्ट हुरकाझचा ३-६, ७-५, ७-६ (५) असा पराभव केला. आता शनिवारी दुबई टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याचा सामना चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेसेलीशी होणार आहे.