पॅरिस : युरोपियन फुटबॉल संघ (युएफा)ने रशियन हुल्लडबाज प्रेक्षकांबाबत कठोर भूमिका घेत रशियन फुटबॉल युनियनवर दीड लाख युरो (१६८३00 डॉलर्स) दंड ठोठावला असून प्रेक्षकांनी आपले वर्तन सुधारले नाही तर रशियाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, असा इशारा ठोठावला आहे.रशियन फुटबॉल युनियनचे अध्यक्ष आणि क्रीडामंत्री विताली मुत्को यांनी या शिक्षेचा स्वीकार केला असून, या निर्णयाचे पालन करण्यात येईल, असे म्हटले आहे. ही शिक्षा मोठी असली, तरी या शिक्षेविरोधात कोणतेही अपील करण्यात येणार नाही. रशियाचा पुढील सामना स्लोव्हाकियाशी होणार आहे.गेल्या शनिवारी मार्सिलेच्या स्टेड वेलोड्रोममध्ये रशिया आणि इंग्लंड यांच्यातील ब गटाचा सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर बुरखाधारी रशियन समर्थकांनी इंग्लंडच्या पाठिराख्यांवर हल्ला केला होता. या घटनेत ३५ जण जखमी झाले होते. युएफाने एका निवेदनात म्हटले आहे की, संघाच्या नैतिक समितीने निलंबित डिस्क्वालिफिकेशन आणि दंड ठोठावला आहे. जर उर्वरित सामन्यात अशीच हुल्लडबाजी झाली, तर रशियन संघाला स्पर्धेतून बाद केले जाईल. फ्रान्सचे पंतप्रधान मॅनुएल वॉल्स यांनी सांगितले की, दंगेखोर रशियन प्रेक्षकांना मायदेशी पाठवण्यात येईल. इंग्लंड-रशिया सामन्यादरम्यान झालेला हिंसाचार इतर शहरातही पसरला होता. यानंतर अनेक रशियनसमर्थकांना अटक करण्यात आली होती. हा हिंसाचार आणखी फैलावण्याची शक्यता फ्रान्सच्या सुरक्षा एजन्सीने वर्तवली आहे. (वृत्तसंस्था)
..तर रशिया स्पर्धेतून बाद होईल
By admin | Published: June 15, 2016 5:09 AM