नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणाऱ्या अविनाश साबळेने रविवारी येथे एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावले. त्याने १ मिनिट ३० सेकंदानी राष्ट्रीय विक्रम मोडला. साबळे सर्व भारतीय धावपटूंच्या बराच पुढे होता. एकूण स्पर्धकांमध्ये तो १० व्या स्थानी राहिला.
गेल्या वर्षी विश्व ॲथ्लेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान ३ हजार मीटर रस्टीपलचेजमध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारा २६ वर्षीय साबळे ६१ मिनिटांपेक्षा कमी वेळेत हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू ठरला.
साबळे अन्य भारतीय प्रतिस्पर्ध्यांच्या बराच पुढे होता. श्रीनू बुगाथा दुसऱ्या स्थानी राहिला. त्याने १ तास ०४ मिनिट १६ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली तर दुर्गा बहादूर बुद्धा १:०४:१९ वेळेसह तिसऱ्या स्थानी राहिला. भारतीय ॲथ्लेटिक्स महासंघाच्या (एएफआय) अधिकृत रेकॉर्डनुसार माजी राष्ट्रीय हाफ मॅरेथॉन विक्रम १:०३:४६ कालिदास हिरवेच्या नावावर होता. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शर्यतीला झेंडा दाखविला. त्यांनी ट्विट केले,‘दिल्ली हाफ मॅरेथॉनचे योग्य स्वास्थ सुरक्षा उपायांसह आयोजन करण्यात आले, हे बघून आनंद झाला. अव्वल आंतरराष्ट्रीय धावपटूंव्यतिरिक्त भारताच्या अविनाथ साबळेने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. सर्व सहभागी धावपटूंचे अभिनंदन.’साबळेने दिल्ली हाफ मॅरेथॉनमधील भारतीयाच्या विक्रमामध्ये सुधारणा केली. सुरुवातीला हा विक्रम बुगाथाच्या नावावर होता. त्याने १ तास चार मिनिट ३३ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली होती.साबळे २०१८ मध्ये अभिषेक पालनंतर दुसऱ्या स्थानी होता.
महाराष्ट्रातील मांडवा गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेला साबळेने गेल्या वर्षी दोहा विश्व ॲथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेज फायनलमध्ये ८ मिनिट २१.३७ सेकंद वेळेसह ऑलिम्पिक पात्रता मिळविली होती. त्या स्पर्धेत त्याला १३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. भारतीय सेनेत सध्या कार्यरत असलेल्या साबळेने गेल्या वर्षी आशियाई ॲथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.
वेलेलेगन, येहुआलॉ अव्वलनवी दिल्ली : इथियोपियाचा अमेदेवर्क वेलेलेगन व यालेमजर्फ येहुआलॉ यांनी रविवारी येथे कोविड-१९ महामारीदरम्यान जैविक रुपाने सुरक्षित वातावरणात आयोजित एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉन विक्रमी वेळेसह जिंकत अनुक्रमे पुरुष व महिला विभागात जेतेपदचा मान मिळवला. या विश्व ॲथ्लेटिक्स गोल्ड लेबल रोड रेसमध्ये विजेत्या पुरुष व महिला धावपटूंनी कोर्स रेकॉर्ड नोंदवले.