ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या फलंदाजी आणि कप्तानीचे अनेक विक्रम तोडून नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत द्विशतक फटकावून सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतके फटकावणारा पहिला फलंदाज ठरल्यानंतर आता विराटची नजर सचिन आणि सुनील गावसकर यांच्या विक्रमावर आहे.
भारताकडून फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुण मिळवण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावे आहे. गावसकर यांनी 1979 साली कसोटी क्रमवारीत 916 गुण मिळवले होते. तर सचिन तेंडुलकरला कारकीर्दीत कधीही 900 गुणांचा टप्पा आपले सर्वोत्तम रेटिंग गुण मिळवताना 898 गुण नोंदवले होते.
आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत हा विक्रम मोडण्याची संधी विराटकडे आहे. सध्या विराट 895 गुणांसह कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे एक मोठी खेळी विराटला सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांच्या पुढे घेऊन जाण्यास पुरेशी ठरेल.
तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्य़ान, कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला स्टीव्हन स्मिथ आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीमध्ये अव्वलस्थानासाठी झुंज रंगण्याची चिन्हे आहेत.