ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - क्रिकेटच्या मैदानावर सचिनने आपल्या अदभुत फलंदाजीने नेहमीच कोटयावधी भारतीयांना आनंद दिला आहे. दु:ख, वेदनेमध्ये असलेल्यांच्या चेह-यावर सचिनने आपल्या फलंदाजीने हास्य फुलविले आहे. आज २४ एप्रिलला क्रिकेटच्या या देवाने ४३ व्या वर्षात पदार्पण केले.
क्रिकेटच्या मैदानावरुन निवृत्ती घेतल्यानंतरही सचिन दुस-यांना समाधान, आनंद देण्याचा आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करतो. एखाद्या कार्यक्रमाला सचिनची उपस्थिती, त्याने सांधलेला संवाद अनेकांना सुखावून जातो. रविवारी सचिनने आपला ४३ वा वाढदिवसही अशाच विशेष पद्धतीने साजरा केला.
बांद्रयाच्या एमआयजी क्लबवर सचिनने मेक-ए-विश या स्वंयसेवी संस्थेच्या मुलांसोबत क्रिकेट खेळून आपल्या वाढदिवसाच्या दिवसाची सुरुवात केली. नोव्हेंबर २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळून सचिन सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यातही त्याने अंतिम डावात ७४ धावांची खेळी केली.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. २०० कसोटी सामन्यात सचिनने १५,९२१ धावा केल्या. ४६३ एकदिवसीय सामन्यामध्ये १८,४२६ धावा त्याच्या नावावर जमा आहेत. तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याच्या नावावर १०० शतकांच्या विक्रमाची नोंद आहे.
Mumbai: Sachin Tendulkar plays cricket with school children on his birthday at M.I.G. Cricket Club. pic.twitter.com/55isMQy2rj— ANI (@ANI_news) April 24, 2016