महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या करागणी गावातील सचिन सर्जेराव खिलारी ( Sachin Sarjerao Khilari) हा नवा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. भारताच्या सचिन खिलारीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपूट F46 प्रकारात आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याच्या या पदकाने भारताची जागतिक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंदही झाली. भारताकडे आता ११ पदके आहेत, त्यापैकी पाच सुवर्ण आहेत. पॅरिसमध्ये २०२३ च्या स्पर्धेत भारताने १० ( ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य) पदकं जिंकली होती आणि ही देशाची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
सचिनने १६.३० मीटर अंतरापर्यंत गोळाफेक केली आणि मागील वर्षी पॅरिस येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने स्वतःचा १६.२१ मीटरचा आशियाई विक्रम मोडीत काढला. पदकतालिकेत चीन सध्या आघाडीवर असून ब्राझीलचा क्रमांक लागतो.
हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने पीटीआयला सांगितले की, त्याला अव्वल पोडियम स्थान मिळवण्याचा आत्मविश्वास आहे. मी येथे सुवर्णपदकाची अपेक्षा करत होतो आणि मी आनंदी आहे. मी पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र झालो आहे आणि तिथेही सुवर्णपदक जिंकण्याची आशा आहे. शाळेत असताना सचिनसोबत एक अपघात झाला आणि त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. गँगरीनमुळे त्याने कोपऱ्याच्या खालील स्नायू गमावले आणि अनेक शस्त्रक्रिया करूनही त्याचा हात कधीच बरा झाला नाही.