ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २२ : भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सोमवारी संपलेल्या चार सामन्यांची कसोटी मालिका २-० ने खिशात घातली. पावसामुळे चौथी आणि अखेरची कसोटी अनिर्णीत राहिल्याने भारताला कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानावर पाणी फेरावे लागले. पण भारतचा आष्टपैलू खेळाडू आर. अश्विनने सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग या जोडीचा विक्रम मोडला आहे. आणि तो पण कमी सामन्यात. सचिन आणि सेहवागच्या नावे कसोटीमध्ये प्रत्येकी ५ वेळा मालिकाविर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे. अश्विनने आज सहाव्यांदा मालिकाविराचा पुरस्कार मिळवताच सचिन आणि सेहवागच्या या विक्रमाला मागे टाकले आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजपर्यंत २०० कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये १५९२१ धावा केल्या. यामध्ये त्याने ५१ शतक झळकावले. तसेच त्याला ५ वेळा मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर भारतीय संघातील माजी सलामिवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनेही १०४ कसोटी सामन्यात ८५८६ धावा करत पाचवेळा मालिकावीर होण्याचा बहुमान मिळवला आहे. आर. अश्विनने खेळलेल्या ३६ सामन्यात २५.२१ च्या सरासरीने १९३ खेळाडू बाद केले. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अश्विनने पाचवेळा मालिकावीरचा बहुमान मिळवला होता. आज वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेच्या शेवटी उत्कृष्ट कामगीरी निमित्त त्याला मालिकावीर घोषित करण्यात आले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टॉप ५ मालिकावीरांची यादी पाहिल्यास पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नचा क्रमांक आहे. शेन वॉर्नने १४५ कसोटी सामन्यांमधून ८ वेळा मालिकावीराचा मान मिळवला आहे. तर चौथ्या स्थानी न्यूझीलंडचे सर रिचर्ड हेडली(८६ कसोटी सामने) यांचा क्रमांक आहे. त्यांनी ८ वेळा मालिकावीराचा मान मिळवला. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान आहे. इमरान खानने ८८ सामन्यांतून आठवेळा मालिकावीराचा किताब पटकावला.दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचा दुसरा क्रमांक आहे. १६६ सामन्यात १३२८९धावा आणि २९२ विकेटस घेऊन ९ वेळा मालिकावीर बनण्याचा मान पटकावला. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या, श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा आद्याप कोणीही विक्रम मोडू शकला नाही. त्याने १३३ सामन्यातून ८०० विकेटसचा विक्रम करत, ११ वेळा मालिकावीराचा बहुमान मिळवला.आर. अश्विनचा सध्याचा विक्रम पाहता तो या यादित अव्वल स्थानि विराजमान होऊ शकतो.
सचिन, सेहवागचा हा विक्रम आर. अश्विनने मोडला
By admin | Published: August 22, 2016 10:21 PM