मुंबई : भारताचा वरिष्ठ माजी फलंदाज आणि वन-डे वर्ल्डकपमध्ये सर्वांत जास्त धावा बनविणाऱ्या सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपसाठी ब्रँड अॅम्बॅसडर म्हणून नियुक्ती केली आहे़ सलग दुसऱ्यांदा या महान खेळाडूकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ यापूर्वी भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांत २०११ मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी सचिनची ब्रँड अॅम्बॅसडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती़ सचिन आता पुढील वर्षी १४ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान होणाऱ्या वर्ल्डकपसाठी आयसीसीच्या विविध कार्यक्रमांत सहभाग घेऊन या खेळाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी पार पाडणार आहे़सचिनने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे़ त्याने २४ वर्षांच्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी आणि ४६३ वन-डे सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे़ या ४१ वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४,३५७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर तब्बल शंभर शतके जमा आहेत़ विशेष म्हणजे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे़ त्याने वर्ल्डकपमधील ४५ सामन्यांत ५६़९५ च्या सरासरीने २,२७८ धावा बनविल्या आहेत़ वर्ल्डकपसाठी ब्रँड अॅम्बॅसडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सचिन म्हणाला, गत सहा वर्ल्डकपमध्ये मी एक खेळाडू म्हणून सहभाग घेत होतो़ मात्र, आता यावेळी २०१५ च्या वर्ल्डकपसाठी ब्रँड अॅम्बॅसडरची भूमिका निभावणे माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव असेल़ कारण प्रत्यक्ष मैदानावर नव्हे, तर मैदानाबाहेर राहून मी ही जबाबदारी पार पाडणार आहे़ सचिन तेंडुलकरने १९८७ च्या वर्ल्डकपच्या आठवणींना उजाळा दिला़ तो म्हणाला, या वर्ल्डकपमध्ये मी मैदानावर बॉलबॉयची भूमिका पार पाडली होती़ त्यावेळी खेळाडूने टोलवलेल्या प्रत्येक चेंडूवर त्यांना चिअर करीत होतो़ दरम्यान, जसजसा वर्ल्डकप जवळ येत आहे, तसतसा या खेळाबद्दल क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढत आहे़ भारतात झालेली मागील स्पर्धा यशस्वी झाली होती, त्याचप्रमाणे आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या या वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन होईल, असेही तो म्हणाला़ (वृत्तसंस्था)
वर्ल्डकपसाठी सचिन तेंडुलकर ब्रँड अॅम्बॅसडर
By admin | Published: December 23, 2014 2:05 AM