कोलकाता : सचिन तेंडुलकर मंगळवारी ईडन गार्डन्सवर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आयपीएलच्या आठव्या पर्वात बुधवारी येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी सचिनने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचवण्यावर भर दिला. त्यानंतर त्याने आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत प्रदीर्घ काळ चर्चा केली. दोन वर्षांपूर्वी येथे कारकीर्दीतील १९९ वा कसोटी सामना खेळणारा सचिन तेंडुलकर आज सकाळी कोलकातामध्ये दाखल झाला आणि थेट ईडन गार्डन्सवर पोहोचला. संघाच्या किटसह सचिन दोन तास सराव सत्रादरम्यान मैदानावर होता. त्याने मुंबई इंडियन्सच्या सर्व २६ खेळाडूंना वेळ दिला. त्यानंतर काही वेळाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघही येथे दाखल झाला. कोहलीने महान फलंदाज सचिनसोबत प्रदीर्घ चर्चा केली. सचिन मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,‘सचिन गेल्या सात वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. सचिन येथे दाखल झाल्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. सचिन तेंडुलकर जेव्हापासून मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करीत आहे तेव्हापासून तो संघाचा अविभाज्य भाग आहे. ज्यावेळी आम्हाला सचिनची गरज भासते त्यावेळी तो उपस्थित असतो.’ (वृत्तसंस्था)
मुंबई इंडियन्सचे मनोधैर्य सचिन उंचावणार
By admin | Published: April 07, 2015 11:34 PM