हैदराबाद : बांगलादेशविरुद्ध २०४ धावांची धमाकेदार खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराट कोहलीचे आपल्या विशेष शैलीत कौतुक केले. ट्विटरच्या माध्यमातून सचिनने आपल्या भावना व्यक्त करत विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुझ्या बॅटवर असलेला स्वीट स्पॉट तू किती जबरदस्त फॉर्ममध्ये आहेस हे सांगतं. त्यासाठी स्कोअरबोर्डची गरज नाही. देव करो तुझी बॅट नेहमी अशीच राहो', असं टिष्ट्वट सचिन तेंडुलकरने केले. सचिन तेंडुलकरच्या या गोड आणि आत्मविश्वास वाढवणा-या ट्विटमुळे विराट कोहली नक्कीच आनंदित झाला असेल. विराट कोहली ५४ वा कसोटी सामना खेळत आहे. यादरम्यान त्याने १६ शतके आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने ४४१३ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सचिनने ४९.८२ च्या सरासरीने ३४३८ धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने ५४ कसोटी सामन्यांमध्ये ११ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली होती.बांगलादेशविरोधात दुसऱ्या दिवशी खेळताना विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील चौथं द्विशतक साजरे केले. ही सलग चौथी मालिका आहे ज्यामध्ये विराट कोहलीने द्विशतक केलं. याअगोदर सर डॉन ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांनी सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम केला होता. भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सहा द्विशतके झळकावली आहेत. तर राहुल द्रविडने पाच वेळा द्विशतक लगावले आहे. (आॅनलाईन लोकमत) - विराट कोहलीने अजून एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. विराट कोहलीने मायदेशात एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. - विराट कोहलीने १५ डावांत १११६ धावा केल्या आहेत. यासोबतच विराट कोहलीने वीरेंद्र सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. - वीरेंद्र सेहवागने २००४-०५ मध्ये १७ डावांत ६९.०६ च्या सरासरीने ११०५ धावा केल्या होत्या.
‘विराट’ खेळीवर सचिनचे ‘ट्विट’
By admin | Published: February 12, 2017 5:28 AM