नवी दिल्ली : ‘एक दिवस तू जगातील नंबर वन खेळाडू बनशील.’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे हे प्रेरक उद्गार माझ्याबद्दल होते. यशाची एकेक पायरी चढण्यासाठी हे शब्द प्रेरणादायी ठरत असल्याची प्रतिक्रिया अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणार असलेला बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने व्यक्त केली. यंदाच्या सत्रात विक्रमी कामगिरी करून अव्वल ५ खेळाडूंमध्ये दाखल झालेल्या श्रीकांतला सचिनने, ‘तू अव्वल स्थान पटकावशील,’ अशा आशयाच्या शुभेच्छा दिल्या. विश्व चॅम्पियनशिपपूर्वी ही भेट हैदराबाद येथे झाली होती. श्रीकांत म्हणाला, ‘‘माझ्यासाठी तो अविस्मरणीय क्षण होता. मी सचिनला लहानपणापासून पाहत आलो. तो महान खेळाडू आहे. त्यातच सचिनने माझ्याबद्दल आश्वस्त उद्गार काढले. मी पाच-सात मिनिटे सचिनसोबत होतो; पण त्या क्षणांमुळे करिअरला कलाटणी मिळाली.’’श्रीकांतने वर्षभरात इंडियन ओपन सिरीज, स्विस ओपन ग्रँडप्रिक्स प्री गोल्ड सिरीजचे विजेतेपद पटकावले. जानेवारीत झालेल्या सय्यद मोदी ग्रँडप्रिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्याने धडक दिली होती. जून महिन्यात जागतिक क्रमवारीत श्रीकांत तिसऱ्या स्थानावर दाखल झाला. अर्जुन पुरस्काराबाबत प्रतिक्रिया विचारताच श्रीकांत म्हणाला, ‘यंदा माझी कामगिरी शानदार होती. त्यामुळे हा पुरस्कार मिळण्याचा विश्वास होता. माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे. बॅडमिंटन खेळणे सुरू करण्याआधी हा पुरस्कार मिळतो, याची जाणीव नव्हती. नंतर पारुपल्ली कश्यपला आॅलिम्पिक खेळल्यानंतर अर्जुन पुरस्कार मिळाल्याने जाणीव झाली. ज्वाला, अश्विनी, सिंधू यांनादेखील नंतर या पुरस्काराने गौरविण्यात आले. चांगले खेळल्यास मलादेखील हा पुरस्कार मिळेल, याची मनोमन खात्री होती.’’
सचिनचे शब्द माझ्यासाठी प्रेरणादायी
By admin | Published: August 20, 2015 11:33 PM