नवी दिल्ली : भारतीय हॉकीत नव्याने प्राण फुंकणाऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व केल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत माजी खेळाडू सरदारसिंग याने व्यक्त केले आहे. त्याचवेळी करिअरमध्ये आॅलिम्पिक पदक जिंकू शकलो नाही, याची खंत वाटते, असेही सरदार म्हणाला. ‘मनप्रीतसिंग याच्या नेतृत्वाखालील पुरुष संघ पुढच्यावर्षी टोकियो आॅलिम्पिकमध्ये चार दशकांचा पदकांचा दुष्काळ संपवेल,’असा विश्वास या माजी कर्णधाराने व्यक्त केला आहे.
सरदार म्हणाला, ‘हॉकीत प्राण फुंकणाºया युगाचा मी साक्षीदार आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तळाच्या स्थानावर राहिल्यानंतर २०१८ ला निवृत्ती घेतली त्यावेळी जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर होतो. हा दीर्घ प्रवास समाधानकारक आहे. सध्या आमचा संघ चौथ्या स्थानावर असल्याने टोकियोपूर्वी मनोबल उंचावलेले असेल.’ ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत आठ सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि दोनदा कांस्य जिंकले आहे.
गेल्या ४० वर्षांत १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे सुवर्ण जिंकले होते. कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक वर्षभर लांबणीवर पडल्याने सरदार म्हणाला, ‘यामुळे भारतीय संघाला कमुकवत गोष्टींवर मात करणे सोपे जाईल. नव्या प्रतिभेचा शोध घेण्याची हीच वेळ आहे. राजकुमार, दिलपी्रत, विवेक सागर, गुरसाहिब यांच्यासारख्या युवा खेळाडूंना मुख्य कोच ग्रॅहम रीड यांनी प्रो लीगमध्ये संधी देणे हा चांगला प्रयोग होता. संघाने स्वत:चे लक्ष विचलित होऊ देऊ नये.’ (वृत्तसंस्था)