- दिनेश गुंडथेट सणस (पुणे) मैदानावरून...आज दुसऱ्या दिवशी सणस मैदानात प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत आणि बापू आवळेच्या रणहलगीच्या निनादात कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला. तो महाराष्ट्राची मुलूखमैदानाची तोफ किरण भगतच्या शानदार विजयी सलामीनेच. दिल्लीच्या मोहितला कोणतीही संधी न देता आपल्या आक्रमक खेळात दुहेरी पट, भारंदाज डावाची उधळण करत ३ मिनिटांतच १० गुणांच्या फरकाने विजय संपादन करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा सागर बिराजदार जो हिंदकेसरीपदाचा प्रबळ दावेदार आहे त्याने एकतर्फी लढतीत केरळच्या राजीवला अवघ्या ३५ सेकंदात अस्मान दाखवले.कालच्या लढतीत अतिशय आक्रमक लढलेला माऊली जमदाडे आज मात्र रेल्वेच्या क्रिशनबरोबर तितकासा प्रभावी ठरला नाही. पहिल्या फेरीतच ९-३ ने पिछाडीवर असलेला माऊली दुसऱ्या फेरीतही ताकद आणि कौशल्य कमी पडल्यामुळे अनुभवी क्रिशनकडून पराभूत झाला. आजच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांची वाहवा मिळवली ती दिल्लीच्या नासिरने. सव्वासहा फूट उंच आणि ११५ किलो वजनाच्या सेना दलाच्या युधबीरला दिलेली चिवट झुंज उपस्थित प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या लढतीत नासिरने ६-४ अशा दोन गुणांच्या फरकाने ही लढत जिंकून धक्कादायक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या संघातून खेळत असलेल्या पुणे शहराचा अभिजित कटकेने आपल्या प्रचंड ताकदीचा वापर करत मध्य प्रदेशच्या सतीशला १० गुणांच्या फरकाने पराभूत करत आपले आव्हान कायम ठेवले. आता खरे लक्ष आहे उद्याच्या उपांत्य फेरी आणि क्रॉस उपांत्य फेरीच्या लढतींकडे.
सागर बिराजदार विजयी
By admin | Published: April 30, 2017 2:02 AM