ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - दुखापतीतून सावरून इराणी करंडक स्पर्धेत खणखणीत द्विशतकी खेळी करणाऱ्या वृद्धिमान साहाने बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. 9 फेब्रुवारीपासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. आज निवडण्यात आलेल्या संघात वृद्धिमान साहाला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात खेळणाऱ्या पार्थिव पटेलला संघातील स्थान गमवावे लागले आहे. साहा बरोबरच सलामीवीर अभिनव मुकुंदनेही दीर्घकाळानंतर संघात पुनरागमन केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झालेला मुंबईकर अजिंक्य रहाणेही संघात परतला आहे. या कसोटीसाठी फिरकी गोलंदाज अश्विन आणि जडेजाबरोबरच जयंत यादव आणि अमित मिश्रालाही संघात स्थान देण्यात आले आहे. तर मध्यमगती गोलंदाजीची मदार उमेश यादव, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारवर असेल.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अभिनव मुकुंद, हार्दिक पांड्या