बँकॉक : अव्वल भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांना गुरुवारी येथे थायलंड ओपनमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तर बी.साई प्रणीतने पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित सायनाला पुनरागमनामध्ये विशेष छाप सोडता आली नाही. दोन महिन्यांनंतर कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सायनाला एक गेमच्या मिळवलेल्या आघाडीचा तिला लाभ घेता आला नाही. तिला जपानच्या बिगरमानांकित सयाका ताकाशाहीविरुद्ध २१-१६, ११-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
पी.व्ही. सिंधूच्या अनुपस्थितीत सायना पराभूत झाल्यानंतर भारताचे या स्पर्धेत महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.सायनाने दुखापतीमुळे इंडोनेशिया ओपन व गेल्या आठवड्यात जपान ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या लढतीनंतर पाचव्या मानांकित श्रीकांतनेही एक गेमची आघाडी गमावली. त्याला पुरुष एकेरीच्या दुसºया फेरीत थायलंडच्या खोसित फेतप्रदाबविरुद्ध २१-११, १६-२१, १२-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
बिगरमानांकित पारुपल्ली कश्यप तिसºया मानांकित चिनी ताइपेच्या चोऊ टिएन चेनला लढत देण्यात अपयशी ठरला. त्याला या सामन्यात केवळ ३३ मिनिटांमध्ये ९-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.गेल्या आठवड्यात जपान ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठणाºया साई प्रणीतने कामगिरीत सातत्य राखताना मायदेशातील सहकारी शुभंकर डेचा २१-१८, २१-१९ ने पराभव करीत अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले. आता साई प्रणीतला पुढच्या फेरीत जपानच्या सातव्या मानांकित कांता सुनेयामाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
पुरुष दुहेरीत मात्र भारतासाठी चांगले वृत्त आहे. त्यात सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने फजर अलफिया व मोहम्मद रिया आर्दियांतो या इंडोनेशियाच्या जोडीचा २१-१७, २१-१९ ने पराभव केला.भारतीय जोडीला यानंतर शुक्रवारी कोरियाच्या चोई सोलग्यू व सियो सेयुंग जाए या जोडीविरुद्ध खेळावे लागेल. मिश्र दुहेरीतही भारतीय खेळाडूंसाठी गुरुवारचा दिवस निराशाजनक ठरला. त्यात प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या जोडीला हाँगकाँगच्या टांग चुन मान व से यिंग सुएत या आठव्या मानांकित जोडीविरुद्ध १६-२१, ११-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.