नवी दिल्ली : कोरोना विषाणू संदर्भात भारतीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमांमुळे भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप व सायना नेहवाल अडचणीत आले आहेत. दोघेही ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाले. मात्र त्यांना भारतात परत येणे कठीण झाले आहे.
कश्यप याने आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना ट्विटवर संदेश पाठवून आपली अडचण सांगितली आहे. त्याने म्हटले आहे की, ‘आम्ही बर्मिंगहममध्ये स्पर्धेत भाग घेण्यास आलो आहोत. तुम्ही लागू केलेल्या नव्या नियमामुळे आमची स्थिती खूपच कठीण झाली आहे. या संदर्भात आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे.’ असे त्याने या संदेशात म्हटले आहे. याचबरोबर त्याने सायना, किदाम्बी श्रीकांत, प्रणव चोप्रा, सिक्की रेड्डी यांची अडचण झाली असल्याचे म्हटले आहे.
बुधवारी आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात नव्या सूचना जाहीर केल्या आहे. याअंतर्गत १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांतून येणाऱ्या किंवा या देशाला भेट देऊन आलेल्या भारतासह कोणत्याही देशाच्या नागरिकांना किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे.
या सर्व भारतीय बॅडमिंटनपटूंनी स्पेनमधील बार्सिलोना ओपन स्पर्धेत फेब्रुवारीमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे भारतात येण्याबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. भारतात आाल्यास सायना व कश्यप यांना दोन आठवडे विलगीकरण कक्षात रहावे लागेल. यामुळे आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जबर फटका बसणार आहे.