नवी दिल्ली : राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आपल्या भावना सहजासहजी व्यक्त करीत नाही. परंतु, त्यांनी आपल्या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकामध्ये सायना नेहवालने आपली अकादमी सोडून प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत सामील झाल्यानंतरच्या वेदना मांडल्या. यासाठी त्यांनी पदुकोण यांना जबाबदारही ठरवले.
गोपीचंद यांनी त्यांचे आगामी पुस्तक ‘ड्रीम्स ऑफ ए बिलिएन : इंडिया अॅन्ड द ऑलिम्पिक गेम्स’या पुस्तकात लिहिले, ‘पदुकोण यांनी एकदाही माझा सकारात्मक उल्लेख केला नसल्याचे आश्चर्य वाटते.’ गोपीचंदच्या पुस्तकातील ‘बिटर रायवलरी’ असे शीर्षक असलेल्या प्रकरणात त्यांनी खुलासा केला की, ‘सायनाने २०१४ विश्व अजिंक्यपदनंतर बेंगळुरूमध्ये पदुकोण अकादमीत विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला.’ सायनाचा पती व राष्ट्रकुल सुवर्ण विजेता पारुपल्ली कश्यपनेही यास दुजोरा दिला आहे.गोपीचंद यांनी लिहिले की, ‘हा प्रसंग माझ्या जवळच्याला कुणीतरी दूर केल्याप्रमाणे होता. सुरुवातीला मी सायनाला न जाण्यासाठी विनंती केली. पण तोपर्यंत ती अन्य कुणाच्या प्रभावात आली होती आणि तिने आपले मन बनविले होते. मी तिला थांबवून तिच्या प्रगतीमध्ये आडकाठी आणू इच्छित नव्हतो.’
त्यावेळी अशी चर्चा होती की, सायनाला वाटत होते की, गोपीचंद तिच्या तुलनेत पी.व्ही. सिंधूवर अधिक लक्ष देत आहेत. गोपीचंद याबाबत म्हणाले, ‘होय, माझ्याकडे अन्य खेळाडूही होते. सिंधूने २०१२-२०१४ कालावधीत बरीच प्रगती केली होती. मला सायनाकडे कधीच दुर्लक्ष करायचे नव्हते. पण, ही बाब मला तिला समजवता आली नाही.’