ऑकलंड : न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकालाने सर्वांचे लक्ष वेधले. जागतिक क्रमवारीत २१२ व्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँग झियी हिने धक्कादायक विजय नोंदवताना जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेली भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिचे आव्हान संपुष्टात आणले.
अत्यंत अनपेक्षित निकाल लागलेल्या सामन्यात २९ वर्षीय सायनाला १९ वर्षीय वँगविरुद्ध एक तास सात मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात १६-२१, २३-२१, ४-२१ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये केलेल्या संथ खेळामुळे सायनाने गेम गमावला. वँगला कडवी झुंज देताना सायनाने अटीतटीच्या लढतीत दुसरा गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. यानंतर सायना बाजी मारेल अशी अपेक्षा होती. मात्र सलग ८ गुणांची कमाई करत वँगने दमदार आघाडी घेत सहजपणे सायनाला नमवून तिला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. अंतिम गेममध्ये सायनाला कँगपुढे आव्हान निर्माण करण्यातही अपयश आले.
पुरुष एकेरीत युवा खेळाडू लक्ष्य सेन यालाही स्पर्धेबाहेरचा रस्ता पकडावा लागला. पात्रता फेरीत सलग दोन विजयांसह मुख्य फेरीत धडक मारलेल्या लक्ष्यकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तैवानच्या वँग जू वेईविरुद्ध लक्ष्यचा २१-१५, १८-२१, १०-२१ असा पराभव झाला. एक तास आठ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात लक्ष्यने पहिला गेम जिंकून आश्वासक सुरुवात केली होती.
त्याचवेळी, एच. एस. प्रणॉय आणि बी. साई प्रणीत यांनी आपापल्या सामन्यात बाजी मारत विजयी कूच केली. प्रणॉयने कीन येयु लोह याचा सरळ दोन गेममध्ये २१-१५, २१-१४ असा पराभव केला. प्रणीतने आपल्याच देशाच्या शुभंकर डे याला २१-१७, १९-२१, २१-१५ असे पराभूत केले.