नवी दिल्ली : सायना नेहवालचा खेळ पाहत मोठी झालेली नागपूरची युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने गुरुवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ऑलिम्पिक कांस्य विजेत्या सायना नेहवालवर अवघ्या ३४ मिनिटांत सरळ गेममध्ये २१-१७, २१-१० ने सनसनाटी विजयाची नोंद केली. हा आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया २० वर्षांच्या मालविकाने विजयानंतर व्यक्त केली.
सामन्यानंतर मालविका म्हणाली, ‘मला आतापर्यंत विश्वासच होत नाही की मी सायनाला हरविले आहे. हा शानदार अनुभव ठरला. मी विजयामुळे फारच आनंदी आहे. सायना माझी आदर्श खेळाडू आहे. सायना एका दशकाहून अधिक काळ भारतीय बॅडमिंटनचे नेतृत्व करीत होती. मी सायनाला खेळताना पाहूनच करिअरची सुरुवात केली. माझ्या खेळावर खरे तर सायनाचा फारच प्रभाव आहे. सायनाच्या खेळाची शैली मला आवडते. सायनाच्या फटक्यांमध्ये अधिक ताकद असल्यामुळे मला तिचा खेळ आवडतो.’
‘मी अष्टपैलू खेळ केला. सायनावर विजय मिळविण्याच्या हेतूने काही विशेष करण्याची गरज भासली नाही. कुठल्याही मोठ्या स्पर्धेत आम्ही दोघी एकमेकींविरुद्ध खेळण्याची ही पहिली वेळ होती. ती माझी आदर्श असल्याने तिच्याविरुद्ध खेळणे स्वप्नपूर्तीसारखे आहे. हा विजय इंडियन ओपनसारख्या सुपर ५०० स्पर्धेत मिळाला हे विशेष. मी माझ्यासाठी मोठी उपलब्धी ठरावी. कारकिर्दीत सर्वांत मोठा विजयदेखील,’ असेही मालविकाने सांगितले.